वडी येथील दफनभूमीला संरक्षक भिंत बांधणेसाठी २७ लाखाचा निधी मंजूर; गायत्रीदेवी यांच्या प्रयत्नाला यश

मुस्लिम समाजाची मागणी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नुकताच गायत्रीदेवी यांनी संरक्षण भिंतीच्या कामासाठी २७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

    औंध: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून वडी, खटाव येथील मुस्लिम समाजाच्या दफनभूमीला संरक्षक भिंत बांधणेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या प्रयत्नाने २७ लाख रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती फिरोज मुलाणी यांनी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

    यावेळी जेष्ठ नेते जे.बी जाधव शेठ,प्रकाश मोहिते, माजी सरपंच अनिल सुर्यवंशी, सुदर्शन मिठारे, पोपट टेलर, सचिन थोरात, अब्दुल मुलाणी, अभिजित येवले, बाबालाल मुलाणी, सिकंदर मुलाणी, सचिन जाधव, विठ्ठल येवले, आकिब मुलाणी उपस्थित होते. दफनभूमीच्या संरक्षण भिंतीचे काम निधीअभावी अर्धवट अवस्थेत रखडले होते. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांचेकडे संरक्षण भिंतीच्या कामासाठी निधीची मागणी केली होती. त्यांनी उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. मुस्लिम समाजाची मागणी लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री यांच्या माध्यमातून नुकताच गायत्रीदेवी यांनी संरक्षण भिंतीच्या कामासाठी २७ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. याकामासाठी औंध शिक्षण मंडळाचे विश्वस्त हणमंतराव शिंदे, राजेंद्र माने, उपमुख्य कार्यकारी अभियंता प्रशांत खैरमोडे,वडी ग्रामपंचायत, ग्रामस्थ यांचे विशेष सहकार्य लाभले. लवकरच या कामाला सुरवात करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    दफनभूमीला जागाही गायत्रीदेवी यांच्या मुळेच

    वडी येथील जुन्या दफनभूमीची जागा कमी पडत होती. मुस्लिम समाजाने जिल्हाधिकारी यांचेकडे जागेची मागणी केली होती. यावेळी देखील गायत्रीदेवी यांनी पाठपुरावा करून तत्कालीन जिल्हाधिकारी सुबराव पाटील यांचेकडून दफनभूमीला एक एकर जागा मिळवून दिली होती.