शिंदेवाडी फाटा-राजेवाडी रस्त्यासाठी ३५ कोटी मंजूर; खासदार श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश

    कराड : सातारा जिल्ह्यातून जाणाऱ्या महाड-भोर-शिरवळ रा.मा.९६५ डी रस्त्यापैकी शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्याचे काम वार्षिक आराखडा २०२१-२२ अंतर्गत मंजूर करण्यात आले आहे. खासदार श्रीनिवास पाटील यांच्या प्रयत्नातून या कामासाठी ३५ कोटीचा निधी मंजूर झाला असल्याची माहिती त्यांच्या संपर्क कार्यालयातून देण्यात आली आहे. सातारा जिल्ह्यातून रायगडकडे जाणाऱ्या या राष्ट्रीय महामार्गाच्या दुरूस्ती, रूंदीकरण व मजबुतीकरण कामाचा २०२१-२२ वार्षिक आराखड्यामध्ये समावेश करण्यात आला आहे.

    सातारा जिल्हा हद्दीतील शिंदेवाडी फाटा ते राजेवाडी रस्त्याच्या कामासाठी ३५ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाला आहे. खा. श्रीनिवास पाटील यांच्या पाठपुरव्याने हा निधी मंजूर झाला असून त्यातून रस्त्याची दुरुस्ती, रुंदीकरण व मजबुतीकरणाचे काम करण्यात येणार आहे.

    वाहनधारकांचे दळणवळण सुखकर होणार

    सातारा जिल्ह्यातून कोकणात जाणाऱ्या या रस्त्याची दुरुस्ती व्हावी यासाठी आमदार मकरंद पाटील, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले यांनी वेळोवेळी मागणी केली होती. त्यासंदर्भात खा. पाटील यांनी सदर रस्त्याची दुरुस्ती करण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांशी पत्रव्यवहार केला होता. याविषयी पाठपुरावा करून त्यांना तशी सूचना केली होती. त्यानुसार या कामास सन २०२१-२२ या वार्षिक आराखड्यामध्ये मंजुरी मिळाली आहे. कोकण आणि पशि्चम महाराष्ट्राला जोडणाऱ्या या रस्त्याच्या दुरुस्तीमुळे नागरिकांचे व वाहनधारकांचे दळणवळण सुखकर होणार आहे.