वाईत डॉक्टरांच्या बेमुदत संपामुळे ३६ हजार पशुधन धोक्यात; शेतकऱ्यांमध्ये खळबळ

    वाई : वाई तालुक्यातील सरकारी १२ आणि खाजगी ३२ जनावरांच्या डॉक्टरांनी आपल्या विविध प्रलंबित मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारला आहे. त्यामुळे ११७ गावातील ३६ हजार जनावरांचे आरोग्य धोक्यात सापडल्याने शेतकऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. बेमुदत पुकारलेल्या या संपाचे निवेदन वाई तालुका पशु वैद्यकीय डॉक्टर संघटनेचे अध्यक्ष डॉ. बिपीन खरात यांनी वाई पंचायत समितीचे गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांना दिले आहे.

    वाई तालुक्यातील ११७ गावांमधील शेतकऱ्यांकडे अंदाजे ३६ हजार जनावरे आहेत. ही जनावरे शेतीला जोडधंदा म्हणून दुधाचा फार मोठा व्यवसाय करुन येथील शेतकरी हे आपला दैनंदिन प्रापंचिक खर्च भागवून मुलांचे शिक्षण करीत असतात. दूध धंदा हा नगरी व्यवसाय असल्यामुळे तालुक्यातील घराघरांमध्ये जनावरे आहेत. वेळप्रसंगी शेतकऱ्यांचे हे किमती पशुधन उपचाराविना धोक्यात येऊ नये म्हणून राज्य सरकारच्या पशु वैद्यकीय विभागामार्फत वाई तालुक्यातील ओझर्डे, शिरगाव, किकली, पाचवड, ऊडतेरे, बावधन, ऊळुंब, रेणावळे, वेलंग, बोपर्डी, मांढरदेव, केंजळ, सुरुर, कवठे या गावांमध्ये पशु वैद्यकीय दवाखान्यामध्ये १२ सरकारी डॉक्टरांच्या नेमणूका करुन औषधे उपचार करुन येथील आवश्यक असणारा दुध व्यवसाय सुरळीतपणे ठेवण्यासाठी या सरकारी डॉक्टरांसोबतच खाजगी ३२ डॉक्टरही शेतकऱ्यांच्या गोठ्यात जाऊन सेवा देत असतात.

    सर्व डॉक्टरांच्या विविध मागण्या राज्य सरकारच्या दरबारात प्रलंबित आहेत. त्या मागण्यांची पूर्तता करुन घेण्यासाठी आणी राज्य सरकारचे लक्ष वेधून घेण्यासाठी वाई तालुक्यातील सरकारी १२ आणि खाजगी ३२ अशा एकूण ४४ डॉक्टरांनी एकत्रित येऊन शुक्रवारपासून बेमुदत संप पुकारल्याने वाई तालुक्यातील शेतकऱ्यांचे ३६ हजार पशुधन धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.