मॅफकोच्या जागेत उभारणार ९ कोटींचे सुसज्ज नाट्यगृह; आमदार महेश शिंदेंच्या प्रयत्नांना यश 

    कोरेगाव : स्वरराज छोटा गंधर्व यांचा उज्ज्वल वारसा लाभलेल्या कोरेगाव शहरात सुसज्ज नाट्यगृह व्हावे, सांस्कृतिक कार्यक्रम व्हावेत, यासाठी अनेक वर्षे नागरिक प्रतिक्षेत होते. दहा वर्षे अनेकांनी भुलभुलैया दाखविला. मात्र, काही केल्या नाट्यगृह काही आकार घेत नव्हते. २०१९ मध्ये लोकनियुक्त आमदार म्हणून जनतेने काम करण्याची संधी दिल्यानंतर आमदार महेश शिंदे यांनी विशेष प्रयत्न करुन मॅफको कंपनीच्या जागेत नाट्यगृह उभारण्याचा निर्धार केला होता. त्यास शासनाने मान्यता दिली असून, ९ कोटी रुपयांच्या प्रकल्पास मंजुरी दिली आहे. येत्या काही दिवसात कोरेगावकरांना आता सांस्कृतिक पर्वणीच मिळणार आहे.

    आमदार महेश शिंदे युवा मंचचे पदाधिकारी राहुल प्रकाश बर्गे, प्रथम नगराध्यक्ष प्रशांत उर्फ राजाभाऊ बर्गे यांनी एका पत्रकाद्वारे नाट्यगृह प्रकल्पाची माहिती दिली. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या सूचनेनुसार नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी नाट्यगृह उभारणीस मान्यता दिली आहे. गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई व आमदार योगेश कदम यांनी त्यासाठी विशेष सहकार्य केले, असे राहुल बर्गे यांनी सांगितले.

    एकनाथ शिंदे यांची कोरेगाववर मेहेरनजर

    कोरेगाव मतदारसंघात कोरोना काळात आरोग्यदूत म्हणून काम करणार्‍या आमदार महेश शिंदे यांनी जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी महत्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कामाची पध्दती पाहता, कोरेगाव शहराला किंबहुना नगरपंचायतीला आदर्श मॉडेल बनविण्यासाठी निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही. कोरेगावला लागेल तेवढा निधी देऊ, अशी ग्वाही नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. मी सुध्दा सातारा जिल्ह्याचा भूमिपूत्र आहे, जिल्ह्यातील घडामोडी रोज जाणून घेतच असतो, कोरेगाव मतदारसंघात जनहिताचे काम अहोरात्र सुरु आहे, सामान्य जनता आनंदी आहे, त्यामुळे या शहराला खास बाब म्हणून वाढीव निधी दिला जाणार आहे.

    शहरातील अंतर्गत सर्वच रस्ते ट्रिमिक्स कॉंक्रीटीकरण, भुयारी गटार योजना आदींसह महत्वाची कामे हाती घेतली जाणार आहेत. एकूणच कोरेगावला रोलमॉडेल बनविण्याची ग्वाही शिंदे यांनी दिली आहे. त्याचबरोबर नाट्यगृह निर्मितीसाठी वाढीव निधी देण्याची तयारी देखील त्यांनी दर्शवली आहे.

    शिष्टमंडळाने घेतली एकनाथ शिंदेंची भेट

    कोरेगावात मॅफको कंपनीच्या जागेवर मध्यवर्ती प्रशासकीय इमारत उभी राहत आहे, तेथेच सुसज्ज नाट्यगृह व्हावे, अशी साहित्यप्रेमी आणि नागरिकांची मागणी होती. यासंदर्भात आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नगरसेवकांच्या शिष्टमंडळाने काही महिन्यांपूर्वीच मुंबईत एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन मागणी केली होती. या मागणीला त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. आमदार महेश शिंदे यांनी सर्वंकष प्रस्ताव स्वत: सादर केला होता. त्यास नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्यता दिली आहे, असे राहुल बर्गे यांनी सांगितले.

    नगरविकास विभागाचे अवर सचिव विवेक कुंभार यांच्या स्वाक्षरीने १६ जूनला शासन निर्णय प्रसिध्द झाला असून, त्यामध्ये नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान योजनेंतर्गत निधी वर्ग करण्यास मान्यता दिली आहे. त्यामध्ये कोरेगाव नगरपंचायतीस नाट्यगृह निर्मिसाठी ९ कोटी रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हाधिकारी व जिल्हा प्रशासन अधिकारी (नगरपालिका प्रशासन) यांच्याकडे तात्काळ निधी वर्ग करण्याचे स्पष्ट निर्देश याच शासन निर्णयामध्ये देण्यात आले आहेत.

    शंभर टक्के रक्कम देणार

    नाट्यगृहासाठी राज्य शासन शंभर टक्के रक्कम देणार असून, नगरपंचायतीला एकही रुपया खर्च करावा लागणार नाही. भविष्यात नाट्यगृह नगरपंचायतीकडेच हस्तांतरीत केले जाणार असून, त्याद्वारे नगरपंचायतीला उत्पन्नाचा आणखी एक मार्ग सुरु होणार आहे, असे राजाभाऊ बर्गे यांनी सांगितले.

    आमदारांनी दिलेला शब्द खरा करुन दाखविला

    कोरेगाव शहराला स्वरराज छोटा गंधर्व यांची उज्ज्वल परंपरा लाभली आहे. गेली अनेक वर्षे सरस्वती विद्यालयातील स्वरराज छोटा गंधर्व व्यासपीठावर सांस्कृतिक कार्यक्रमांचा कोरेगावकरांनी आस्वाद घेतला. मात्र, काळाच्या ओघात सांस्कृतिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या. दरवर्षी कोरेगावात स्वरराज छोटा गंधर्व यांचा पुण्यस्मरण दिन उत्साहात साजरा केला जातो, त्यानिमित्त संगीत मैफील जमते, त्यास उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतो. सुसज्ज नाट्यगृह नसल्याने हा कार्यक्रम मंगल कार्यालयातील हॉलमध्ये घेतला जातो, त्यामुळे बाहेरुन येणार्‍या साहित्यिक आणि कलाकारांचा हिरमूस होतो, आमदारकीची सुत्रे हाती घेण्यापूर्वीपासून महेश शिंदे हे स्वत: या कार्यक्रमाला उपस्थित राहिले आहेत. त्यावेळी त्यांनी सुसज्ज नाट्यगृह उभारणीचा शब्द दिला होता आणि आता तो खरा करुन दाखविला आहे. या नाट्यगृहामुळे कोरेगाव नजिकच्या काळात सांस्कृतिक राजधानी म्हणून लौकिक पावेल, असा विश्‍वास राजाभाऊ बर्गे यांनी व्यक्त केला.