केंजळगड पाहण्यासाठी जात असताना १० वर्षीय बालक कोसळला दरीत

    वाई : केंजळगड पाहण्यासाठी जात असताना मयंक उरणे (वय १०) हा मुलगा खोल खड्यात कोसळून गंभीर जखमी झाला. त्यास पाकेरी ग्रामस्थांच्या मदतीने बाहेर काढले. त्याचा जीव वाचवण्यात स्थानिकांना यश आले.

    थंड हवा पावसाची रिपरिप आणि पडलेल्या दाट धुक्यातून गुडघ्यावर असणाऱ्या गवतातून पाऊल वाटेतून वाट शोधत सासवड ता.पुरंदर परिसरातील रहिवासी असलेले सात ते आठ पर्यटक केजळगड पाहण्यासाठी जात असताना मयंक हा वडील गणेश उरणे यांच्यासह मित्रांबरोबर केंजळगड पाहण्यासाठी घनदाट गवतातून जात असताना तो पाय घसरून खाली खोल खड्यात पडला. त्याचा घेतला असता तो सापडत नसल्याने हे सर्वजण आदल्या दिवशी मुक्कामी असलेल्या आसरे रायरेश्व रस्त्यावर असणाऱ्या पाकेरे वस्तीवर येऊन घडल्या प्रकाराची माहिती दिली.

    त्यानंतर तेथील गंगाराम सपकाळ, सागर पाकीरे, सुरेश पाकीरे, रामदास पाकीरे, सचिन पाकीरे, नवनाथ पाकीरे, विलास पाकीरे, विजय पाकीरे असे सर्वजण ग्रामस्थांसोबत घेऊन मयंक उरणे याचा शोध घेण्यास गेले. त्यांनी खोल दरीतून त्याला गंभीर जखमी अवस्थेत बाहेर काढले. त्याला सातारा येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.