वेळे गावानजीक कार व टेम्पो यांच्यात भीषण अपघात; एक ठार, चौघे गंभीर जखमी

    कवठे : वेळे गावानजीक कार व टेम्पो यांच्यात धडक होऊन मोठा अपघात झाला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून, चौघे गंभीर जखमी झाले आहेत. नवनाथ खांडेकर (वय ४५) असे या अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    यामध्ये तात्यासो दादा खांडेकर (वय २३), सागर नवनाथ खांडेकर (वय २१), यमुनाबाई नवनाथ खांडेकर (वय ४० सर्व राहणार हिंगणी, ता. माण) व काशिलिंग माने (रा. मानेचेवाडी ता. माण) हे कारमधील सर्वजण जखमी झाले आहेत. या सर्वांना पुढील उपचारासाठी सातारा येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.

    दरम्यान, मध्यरात्री तीन वाजता झालेल्या या अपघाताचा आवाज ऐकून वेळे ग्रामस्थांनी घटनास्थळावर धाव घेतली व तातडीने मदतकार्याला सुरुवात केली. त्यामुळे जखमींना सातारा येथील रुग्णालयात जलद दाखल करण्यात आले. भुईंज पोलिसांना घटनास्थळावर धाव घेत तातडीने अपघातग्रस्त वाहने महामार्गावरून हटवून वाहतूक सुरळीत केली.

    …तर वाचले असते प्राण

    या अपघातातील मृतास याच परिसरात तातडीने आरोग्यसुविधा उपलब्ध झाली असती तर त्याचे प्राण वाचू शकले असते. परिसरातील अपघातग्रस्त रुग्णांना नजीकच्या अद्यावत खाजगी किंवा शासकीय रुग्णालयात दाखल केल्यास अनेक अपघातग्रास्तांचे प्राण वाचू शकतात. परंतु भुईंज येथे मंजूर झालेले ग्रामीण रुग्णालय जिल्हा प्रशासनाच्या वेळकाढू वृतीने आजपर्यंत कार्यन्वित नाही तर भुईंज प्राथमिक आरोग्य केंद्रात एम.बी.बी.एस. डॉक्टरसुद्धा पाठपुरावा करून मिळत नाही.