रयत साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर विलासकाकांचा पूर्णाकृती पुतळा

  कराड : शेवाळेवाडी (म्हासोली), ता. कराड येथील रयत सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर लोकनेते स्व. विलासराव पाटील- उंडाळकर (काका) यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचा भूमिपूजन समारंभ गुरुवारी (दि. 19) सकाळी 11 वाजता आयोजित केला असल्याची माहिती कारखान्याचे व्हाईस चेअरमन आप्पासाहेब गरुड यांनी दिली.

  स्वर्गीय लोकनेते विलासराव पाटील-उंडाळकर यांनी 50 वर्षांपेक्षा जास्त काळ राजकीय, सामाजिक क्षेत्रात भरीव असे काम केले आहे. सलग 35 वर्षे कराड दक्षिण मतदारसंघाचे नेतृत्व करताना राज्याच्या मंत्रिमंडळात सहकार खात्यासह विविध खात्याचे काम पाहिले होते. सातारा जिल्हा बँक त्याच्याच मार्गदर्शनाखाली देशात आदर्श बँक म्हणून नावारूपास आली.

  रयत सहकारी साखर कारखान्याची स्थापना करताना कराड तालुक्यातील काकांच्या मार्गदर्शनाखाली सुरु असणाऱ्या संस्था आज ही सहकारात आदर्शवत असे कामकाज युवा नेते ऍड. उदयसिंह पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. अशा नेतृत्वाच्या स्मृती कायमस्वरूपी चिरंतन रहाव्यात या हेतुतून रयत कारखान्याच्या वार्षिक साधारण सभेत कारखाना कार्यस्थळावर पूर्णाकृती पुतळा उभा करण्याचा निर्णय घेणेत आला होता.

  गुरुवारी सकाळी काकांसोबत काम करणाऱ्या ज्येष्ठ कार्यकर्त्याच्या शुभहस्ते पुतळ्याचे भूमिपूजन केले जाणार असून, यावेळी सातारा जिल्हा, कराड तालुक्यातील विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी कोविड 19 चे नियम पाळून सर्व कार्यकर्ते, सभासद यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आप्पासाहेब गरुड यांनी केले आहे.

  असा असणार पुतळा…

  12 फूट उंचीचा पुतळा साकारण्याचे काम कोल्हापूरचे शिल्पकार संजय तडसरकर हे करत आहेत. पुतळ्याच्या चबूतरा 9 फूट उंचीचा आहे. चबुतरा भोवती चिरा दगडामध्ये कॅपाउंड असून त्याला डेकोरेटिव्ह ग्रील आहे. पुतळ्याच्या पाठीमागे 20 फूट उंचीची कर्व्हेचर भिंत असून, पूर्ण बांधकामास ग्रॅनाईट व पूर्ण परिसर फुल झाडांनी सुशोभित केला जाणार आहे. काकांच्या पहिल्या स्मृती दिनाच्या दिवशी या पुतळ्याचे काम पूर्ण करण्याचा संचालक मंडळाचा मानस आहे.