पती-पत्नी रिसॉर्टमध्ये झोपले असताना ‘तो’ आला अन् केला महिलेचा विनयभंग; गुन्हा दाखल

    सातारा : वाई तालुक्यातील धोम धरणाच्या जवळच बोरीव गावच्या हद्दीत असलेल्या एका रिसॉर्टमध्ये फिरण्यास आलेल्या जोडप्याच्या रूममध्ये शिरून महिलेचा विनयभंग केला. या प्रकरणी वाशीम येथील एकावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. विक्रम गोविंदा राठोड (रा.साखरडो, जि. वाशीम) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

    वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, त्या २७ वर्षीय पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून ती व तिचा पती अन्य राज्यातून वाई येथे फिरण्यासाठी आले होते. १३ जूनला ते बोरीव येथील मगन्स रिसॉर्टमध्ये राहिले होते. रूम नंबर १ मध्ये दोघे पती-पत्नी झोपले असताना रात्री ११ वाजता त्या महिलेला अन्य कोणीतरी छेडछाड करत असल्याचे जाणवले. त्यावेळी एका बाजूला पती तर दुसऱ्या बाजूला कोणीतरी असल्याचे दिसताच तिने तिच्या पतीला उठवले. त्यानंतर तो पळून जाऊ लागला. तिच्या पतीने विक्रम राठोड यास पकडले. महिलेच्या छेडछाड केल्याप्रकरणी राठोड याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हवालदार पवार तपास करत आहेत.