बैलाचा ‘तो’ मारेकरी अखेर गजाआड; मेढा गुन्हे प्रकटीकरण पथकाची कारवाई

    मेढा : मेढा पोलीस ठाणे हद्दीतील सरताळे कॅनॉल लगत बैलाची अमानुषपणे हत्या करणार्‍या मारेकर्‍याच्या मुसक्या आवळण्यात मेढा पोलिसांना यश आले आहे. या गुन्ह्यात वापरलेली पिकअप जीपसुद्धा हस्तगत करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी जावळी तालुक्यातील सरताळे कॅनॉल लगत एका बैलाची अमानुषपणे हत्या करण्यात आली होती. याबाबतचा गुन्हा मेढा पोलिसांत दाखल झाला होता.

    गुन्ह्याच्या अनुषंगाने मेढा पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने यांनी पोलीस अधीक्षक अजय कुमार बन्सल यांच्या मार्गदर्शन व सुचनांनुसार गुप्त बातमीदारामार्फत बातमी मिळवली होती. त्यानंतर माने यांनी मेढा पोलीस ठाण्याकडील गुन्हे प्रकटीकरण तपास पथक तयार करुन त्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक विकास शिंदे, नितीन जाधव, पोलिस हवालदार संजय ओवाळ, चालक पोलिस हवालदार जितेंद्र कांबळे, पोलिस नाईक इम्रान मेटकरी, अमोल पवार, पोलिस कॉन्स्टेबल सनी काळे, पद्मसेन घोरपडे, अभिजित वाघमळे यांची नियुक्ती करुन त्यांना योग्य त्या सूचना देऊन मयत बैलाच्या मारेकर्‍याचा शोध घेऊन त्यास अटक करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार हे पथक मौजे किकवी, ता. भोर, जि. पुणे गावच्या हद्दीत भरणार्‍या आठवडी बैल बाजारात दाखल झाले. तेथे त्यांनी अत्यंत चतुराईने मृत बैलाच्या मारेकर्‍याचा शोध घेतला.

    यानंतर मारेकर्‍याची माहिती प्राप्त केल्यावर हा गुन्हा कुमार प्रकाश पडवळ (वय 28, रा. कुंभारवाडी, पोस्ट आसले, ता. वाई, जि. सातारा) यास ज्या पिकअप जीपमधून त्याने बैलास आणले व त्यास क्रूर वागणूक देऊन मेढा पोलीस ठाणे हद्दीतील सरताळे कॅनॉल लगत असलेल्या शेताचे बांधावर मारुन टाकले. त्या पिकअप जीप (क्र. एमएच 11 सीएच – 2329) सह ताब्यात घेऊन त्याच्याकडे अधिक तपास केला असता त्याने संबंधित बैलाला मारुन टाकल्याबाबतची कबुली दिली. यानंतर त्यास अटक केली आहे. या गुन्ह्यात आणखी आरोपी असल्याची शक्यता नाकारता येत नसल्याने मेढा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण तपास पथक आरोपींचा शोध घेण्यासाठी रवाना झाले आहे.