लोणंद व खंडाळा येथील दुकानातील रोकड चोरी करणाऱ्या गुन्हेगारास अटक; लोणंद पोलिसांची कारवाई

    लोणंद : लोणंद येथे पाच दिवसांपूर्वी एच. आर. कॉम्प्युट्रॉनिक्स या मोबाईलच्या दुकानातून मोबाईल व रोख रकमेची चोरी करणाऱ्या गुन्हेगारास लोणंद पोलिसांनी अटक केली. याबाबत लोणंद पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, लोणंद येथे 29 सप्टेंबर हर्षद भुजबळ यांच्या खंडाळा रोडवरील दुकानात ग्राहक म्हणून आलेल्या दोघांनी दुकानात सुट्टे पैसे हवे आहेत, असे सांगून कपाटातील विक्रीसाठी ठेवलेला नवीन विवो कंपनीचा मोबाईल व कॅश काउंटरमधील दोन हजार रुपये रोख असे 27 हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल हातचलाखीने चोरून नेल्याची तक्रार हर्षद भुजबळ यांनी लोणंद पोलीस स्टेशनला दिली होती.

    याचा तपास करीत असताना दुकानातील सीसीटीव्हीच्या माध्यमातून तसेच लोणंद शहरात ठिकठिकाणी लावलेल्या सीसीटीव्हीची तपासणी करण्याच्या सूचना गुन्हे प्रकटीकरण पथकास देण्यात आल्या होत्या. त्याआधारे पोलीस उपनिरीक्षक गणेश माने व महिला पोलीस उपनिरीक्षक स्वाती पवार तसेच गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्हीच्या आधारे व तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्ह्यातील आरोपी हे पुणे येथील कात्रज व हडपसर या भागात राहणारे असल्याचे निष्पन्न करून यातील देविदास किसन पवार (वय 39, रा. अंजनी नगर, कात्रज, पुणे) यास ताब्यात घेतले असता त्याने वरील गुन्ह्याची कबुली दिली. त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने अशाचप्रकारे खंडाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत बँकेमध्ये चोरी केल्याचे कबूल केले आहे.

    सातारा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल व उपविभागीय पोलिस अधिकारी फलटण तानाजी बर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली लोणंद पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, स्वाती पवार, सहाय्यक फौजदार पाडवी गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस नाईक संतोष नाळे, शशिकांत गार्डी, श्रीनाथ कदम, अभिजीत घनवट, केतन लाळगे, अविनाश शिंदे, शिवशंकर तोटेवाड, गोविंद आंधळे यांनी कारवाई सहभाग घेतला.