चार वर्षांपासून फरार असणारा अट्टल गुन्हेगार जक्कल काळे जेरबंद; १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस

    सातारा : गेल्या चार वर्षांपासून फरार असणारा अट्टल गुन्हेगार जक्कल रंगा काळे याला जेरबंद करण्यात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. त्याच्याकडून १० घरफोडीचे गुन्हे उघडकीस आले असून, ४ लाख ६८ हजार रुपये किमतीचे दहा तोळे सोने हस्तगत करण्यात आले.

    याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पोलीस अधीक्षक अजय बन्सल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी जिल्ह्यातील उघडकीस न आलेले घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला दिल्या होत्या. त्यानुसार पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, आनंदसिंग साबळे यांचा समावेश असणारे स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तयार करून संबंधित गुन्हे उघडकीस आणण्याच्या सूचना त्यांना दिल्या होत्या. दरम्यान, पोलीस अभिलेखावरील खुन, जबरी चोरी, घरफोडी यासारख्या गुन्ह्यातील मागील चार वर्षापासून फरार असलेला अट्टल गुन्हेगार जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे, रा. सुरुर, ता. वाई याने फरार कालावधीमध्ये वाई, जावली, कोरेगाव, खंडाळा, सातारा तालुक्यामध्ये घरफोड्या केल्याची माहिती पथकाला प्राप्त झाली.

    खंडाळा, कोरेगाव व वाई तालुक्यात असणाऱ्या उसाच्या शेतांमध्ये पथकातील पोलिसांनी मजुराच्या वेषात वेषांतर करून शोध घेतला असता ११ जुलै रोजी तो रेवडी, ता. कोरेगाव येथे उसाच्या शेतात लपून बसला असल्याची माहिती मिळाली. पथकाने उसाच्या शेताच्या आजूबाजूला सापळा लावून उसाच्या शेतात जाऊन त्याला शिताफीने ताब्यात घेतले. त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने सर्व प्रथम कोरेगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या गुन्ह्याची कबुली दिली. त्याला अटक करून कोरेगाव येथील न्यायालयासमोर उभे केले असता न्यायालयाने त्याची पाच दिवस पोलीस कोठडीत रवानगी केली.

    जक्कल उर्फ जकल्या रंगा काळे हा अट्टल गुन्हेगार असून, तो पोलीस कोठडीत असताना त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने कोरेगाव, वाठार, मेढा, वाई, भुईंज, सातारा आणि खंडाळा परिसरामध्ये दहा घरफोडीचे गुन्हे असल्याची कबुली दिली. त्याच्याकडून ४ लाख ६८ हजार रुपये किमतीचे १० तोळे सोने हस्तगत करण्यात आले आहे. कारवाईमध्ये पोलीस उपनिरीक्षक मधुकर गुरव, सहाय्यक फौजदार उत्तम दबडे, तानाजी माने, पोलीस हवालदार कांतीलाल नवघणे, संतोष पवार, संतोष सपकाळ, संजय शिर्के, विजय कांबळे, अतिश घाडगे, पोलीस नाईक शरद बेबले, नितीन गोगावले, मंगेश महाडिक, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, रवी वाघमारे, निलेश काटकर, अमित सपकाळ आदींनी सहभाग घेतला.