महाबळेश्वर-पांचगणी रस्त्यावर अपघात; एक जखमी

    महाबळेश्वर : वेण्णालेकपासून जवळच असलेल्या लिंगमळा येथे महाबळेश्वर पांचगणी रस्त्यावर शुक्रवारी सकाळी साडेनऊ वाजता एक टॅंकर व कार यांची समोरासमोर धडक झाली. त्यामुळे कार रस्त्याच्या कडेला असलेल्या खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारचालक किशोर वसंत गोळे (वय 25 रा. जगताप हाॅस्पिटलजवळ, बावधन रोड, वाई) जखमी झाला आहे.

    महाड येथून रसायन भरलेला टॅंकर हा महाबळेश्वर मार्गे हैद्राबादकडे निघाला होता. तर वाई येथून एक मारूती कार ही महाबळेश्वरकडे निघाली होती. ही दोन्ही वाहने आज सकाळी साडेनऊच्या दरम्यान लिंगमळा परिसरातील शिवाय हाॅटेल समोरील अवघड वळणावर आली असता दोन्ही वाहनचालकांना समोरील वाहन दिसले नाही. सकाळी रस्ता मोकळा असल्याने दोन्ही वाहने भरधाव निघाली होती. या दोन्ही वाहनांची सकाळी साडेनऊ वाजता समोरासमोर धडक होऊन अपघात झाला.

    टॅंकरची धडक इतकी जोरात बसल्याने कार रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या सात ते आठ फुट खोल खड्ड्यात कोसळली. या अपघातात कारचालक गोळे जखमी झाले. अपघात झाल्यानंतर जवळच असलेल्या हाॅटेल व ढाब्यातील काही स्थानिक नागरिक धावून आले. त्यांनी कारमधील जखमी व्यक्तीस प्रथम बाहेर काढले व त्यास येथील ग्रामीण रूग्णालयात भरती केले. या ठिकाणी त्याच्यावर उपचार सुरू करण्यात आले. मात्र, त्याची प्रकृती बिघडल्याने त्याला पुढील उपचारासाठी वाई येथील मिशन रूग्णालयात दाखल करण्यात आले.

    सकाळी अपघात होताच अपघातातील टँकर फिरला. त्यामुळे संपूर्ण रस्ताच बंद झाला. अनेक वाहने रस्त्याच्या बाजूने मार्ग काढीत जात होती. अशातच एक ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या मातीतून पुढे निघण्याचा प्रयत्न करीत होता. परंतु, पावसाळी वातावरणामुळे रस्त्याच्या कडेला चिखल झाला होता. या चिखलात हा ट्रक अडकल्याने महाबळेश्वर पांचगणी या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती.

    महाबळेश्वर पोलिसांनी तातडीने क्रेन मागवून रस्त्यात बंद पडलेला टॅंकर बाजूला करून वाहतूक पूर्ववत चालू केली. या अपघाताची नोंद महाबळेश्वर पोलिस ठाण्यात करण्यात आली असून, या अपघाताचा पुढील तपास महाबळेश्वर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक बी. ए. कोंडुभैरी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हवालदार मोहन क्षीरसागर, श्रीकांत कांबळे व पुरूषोत्तम जाधव हे करीत आहेत.