अंत्यसंस्कारानंतर धार्मिक विधी साठी ‘फोटोफ्रेम’ करीताही धावाधाव

लॉकडाउनमुळे काही प्रमाणात लोकांचा संपर्क कमी होत असला तरी कॊरोना केअर सेंटर व लसीकरणासाठी झालेली गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व आरोग्य विभागाकडून नियोजन होणे गरजेचे आहे. त्याठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देण्याची वेळ आली आहे. 

    सातारा : जिल्ह्यात कॊरोना प्रतिबंधक लस तुडवडा व  कॊरोना रुग्णांना उपचारासाठी दाखल केल्यानंतर  त्वरित लागणारे  बेड,ऑक्सिजन,रेमडेसीविर इंजेक्शन  उपलब्ध होऊ शकत नाही. त्यामुळे कॊरोना व इतर आजाराने मृत्यूचे प्रमाण वाढत आहे.  आता तर अंतिम संस्कार केल्यानंतर धार्मिक विधी साठी  मयताच्या फोटो  फ्रेम करिताही धावाधाव करावी लागत असल्याचे चित्र दिसत आहे.

    दुसऱ्या टप्प्यात संपूर्ण एप्रिल महिना जिल्ह्यात कोरोनाने पुन्हा अक्षरशः कहर केला. शनिवारी दि 30 एप्रिल रोजी वर्षातील २४९४ एवढी उच्चांकी कॊरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. दि २ मे रोजी देखील २२१७  जणांचा अहवाल  कॊरोना बाधित म्हणून दुपारी जाहीर करण्यात आला आहे. दि १५ मे पर्यंत कॊरोना ची दुसरी लाट ओसरल्यावर परिस्थिती बदलेले, असा दिलासादायक अंदाज वर्तविण्यात आला आहे. आता पर्यंत सातारा जिल्ह्यात कॊरोना बधितांची संख्या १,०५,३५० व ८३,८१९ उपचारानंतर कॊरोना मुक्त झाले आहेत. आता पर्यंत २,५३० जणांचा मृत्यू झाला आहे. इतर आजाराने सुमारे आठशे जण दगावले आहेत. दररोज चाळीस ते पंचेचाळीस जणांना ऑक्सिजन व इतर आरोग्य सुविधा मिळत नसल्याने बिकट स्थिती पाहण्यास मिळत आहे.

    लॉकडाउनमुळे काही प्रमाणात लोकांचा संपर्क कमी होत असला तरी कॊरोना केअर सेंटर व लसीकरणासाठी झालेली गर्दी कमी होण्याचे नाव घेत नाही. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त व आरोग्य विभागाकडून नियोजन होणे गरजेचे आहे. त्याठिकाणी काळजीपूर्वक लक्ष देण्याची वेळ आली आहे.

    सातारा जिल्ह्यात वाढत्या मृत्यूच्या प्रमाणामुळे अंत्यविधीसाठी सुध्दा वाट पहावी लागत आहे. त्यानंतर घरोघरी धार्मिक विधी करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याची व फोटो फ्रेमची जुळवाजुळवा करताना अक्षरशः नातेवाईकांना भ्रमंती करावी लागली आहे. फोटो फ्रेमचा तुटवडा असल्याने काहींनी मयत व्यक्तीचे फक्त जुन्या फोटोची कॉपी करून धार्मिक विधी पार पाडण्यात धन्यता मानली आहे. गरिबांचा घरी खायला काहीच नाही, त्यांनी कुठून धार्मिक विधीला साहित्य आणायचे? असा विचार करून श्रद्धेने साध्या पद्धतीने विधी उरकला आहे. भावनेला मुरड घालून काहींनी मृत्यू व्यक्तीच्या स्मरणार्थ गरिबांना मदत करण्याचे चांगले पाऊल उचलले आहे. हे परिवर्तन असून त्याचा लाभ गरजवंताला होऊ लागला आहे. ही बाजू सुध्दा पुढे आली आहे.सातारा जिल्ह्यातील वितरक देवराज कामाठी यांनी सांगितले की, वाहतूक बंद असल्याने ग्लास, फायबर, प्लायवुड, कागद असे नवीन साहित्य आले नाही. जेवढे फोटो फ्रेम साहित्य होते ते संपले आहे. लहान फ्रेम सुध्दा लोक घेऊन जात आहेत.ग्रामीण भागातील फोटोग्राफर पूर्वी दोन ते तीन फ्रेम घेऊन जात होते. आता दहा ते पंधरा फ्रेमची मागणी करीत आहेत.खेड ता सातारा येथील विजय फोटोचे विजय भुजबळ व वडूज ता खटाव येथील आयाज मुल्ला म्हणाले, जिल्ह्यात किमान साडे तीन हजार फोटो स्टुडिओआहेत. सध्या मागणी वाढली असली तरी साहित्य उपलब्ध होऊ शकत नाही. ही वस्तुस्थिती आहे. माणुसकी म्हणून आता फ्रेम मधील काही जुने फोटो काढून दुसऱ्याचे फोटो लावावे लागत आहेत.शेवटी ग्राहकांशी नाते असते ते अशा प्रसंगी टिकवून ठेवण्यासाठी तडजोड करावी लागते. असे अनेकांनी अनुभव कथन केले आहे.