उदयनराजेंच्या आदेशानंतर चौपाटी पुन्हा गांधी मैदानावर पण … घाण दिसल्यास चौपाटी बंद करण्याचा दिला इशारा

लॉक डाऊनमुळे चौपाटीवरील विक्रेत्यांचे आर्थिक गणित पूर्णतः विस्कटले. तब्बल आठ महिने एकशे वीस गाडेधारकांना आर्थिक चणचणीमुळे देशोधडीला लागण्याची वेळ आली होती. गांधी मैदानावरील चौपाटी बंद करून विक्रेत्यांना आळूचा खड्डा येथे पुनर्वसन देण्यात आले होते.

    सातारा: करोना संक्रमणाच्या भीतीने तब्बल वर्षभर बंद असलेली चौपाटी खासदार उदयनराजे भोसले यांच्या आदेशानंतर सुरू झाली आहे. आळूच्या खड्डयातून गाडे आणि टपऱ्या लगोलग स्थलांतर करण्याची प्रक्रिया शनिवारी सकाळपासूनच सुरू करण्यात आली होती. विक्रेत्यांनी उदयनराजे यांची जल मंदिर येथे भेट घेतल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे.

    मात्र चौपाटी सुरू करण्यापूर्वी उदयनराजे यांनी करोना संक्रमणाच्या पाश्र्वभूमीवर एक गाडा एक मालक, स्वच्छता टापटीप आणि योग्य सामाईक अंतर राखण्याच्या स्पष्ट सूचना चौपाटी विक्रेत्यांना दिल्या आहेत . चौपाटीच्या जागेत अस्वच्छता दिसल्यास ती पुन्हा बंद करण्याचा इशारा उदयनराजे यांनी दिला आहे .

    करोना संक्रमणाचे रूग्ण साताऱ्यात सर्वप्रथम आढळून येण्याच्या घडामोडींना एक वर्ष पूर्ण होत असताना शनिवारी गांधी मैदानावर चौपाटी सुरू करण्याचे आदेश खासदार उदयनराजे भोसले यांनी दिले .करोनाचा साताऱ्यात उद्रेक झाल्यानंतर एक वर्षापूर्वी चौपाटी बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागला होता . त्यानंतर लागू झालेल्या लॉक डाऊनमुळे चौपाटीवरील विक्रेत्यांचे आर्थिक गणित पूर्णतः विस्कटले. तब्बल आठ महिने एकशे वीस गाडेधारकांना आर्थिक चणचणीमुळे देशोधडीला लागण्याची वेळ आली होती. गांधी मैदानावरील चौपाटी बंद करून विक्रेत्यांना आळूचा खड्डा येथे पुनर्वसन देण्यात आले होते. ही जागा सुध्दा विक्रेत्यांनी काहीशा नाराजीने स्वीकारली होती. मात्र तेथील जागेला मात्र खवैय्यांचा अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. परिणामी येथील पन्नास विक्रेत्यांनी शनिवारी सकाळी खासदार उदयनराजे भोसले यांची जल मंदिर येथे भेट घेतली .आळूचा खड्डा येथे सुविधांचा अभाव आणि अस्वच्छता यामुळे व्यवसाय होत नसल्याची अडचण विक्रेत्यांनी मांडली. यावेळी उपनगराध्यक्ष मनोज शेंडे उपस्थित होते. विक्रेत्यांशी चर्चा करून उदयनराजे यांनी गांधी मैदानावर पुन्हा चौपाटी सुरू करण्याची परवानगी दिली . मात्र प्रत्येकाचा एकच गाडा, पुरेसे सामाईक अंतर, टापटीप आणि स्वच्छता या अटींवर चौपाटी सुरू करण्यास परवानगी देत असल्याचे उदयनराजे यांनी स्पष्टपणे बजावले. चौपाटीवर घाण दिसल्यास ती बंद करण्याचा आदेश उदयनराजे यांनी दिला .पालिका प्रशासनाने मात्र या संदर्भात चुप्पी साधली आहे. चौपाटी सुरू करण्याचा आदेश हा खासदार उदयनराजे भोसले यांचा आहे , मात्र मुख्याधिकाऱ्यांकडून आम्हाला कोणताही आदेश नसल्याचे अतिक्रमण निरीक्षक प्रशांत निकम यांनी सांगितले .

    विक्रेत्यांना आरटीपीसी आर चाचणी करावी लागणार
    चौपाटीवर व्यवसाय करणाऱ्या विक्रेत्यांना खबरदारी म्हणून आरटीपीसी आर चाचणी करावी लागणार आहे . करोना प्रतिबंधात्मक उपायांचे कठोरपणे पालन करावे लागणार अन्यथा दंडात्मक कारवाई करणार असल्याचे स्पष्ट संकेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनी दिले . या चौपाटीवरील विक्रेत्यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळून सक्तीने मास्कचा वापर करावयाचा आहे .