साताऱ्यातील ‘या’ गावात पुन्हा लॉकडाऊन

    ओझर्डे : वाई तालुक्यातील ३५०० लोकवस्तीचे घाटाच्या पायथ्याशी वसलेले शिरगाव या गावात कोरोनाचे थैमान आता सुरु आहे. या अतिप्रमाणात झालेल्या थैमानामुळे गेले १० दिवस ते आजअखेर दोन महिन्याच्या बाळासह ४२ कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झाली आहे. तसेच गावात ८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाल्याने गावामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. याची गंभीर दखल वाईचे तहसीलदार रणजीत भोसले व गट विकास अधिकारी उदय कुसुरकर यांनी घेतली आहे. त्यांनी शुक्रवार (दि. २) तातडीने शिरगाव गावाला भेट देऊन पाहणी केली. विलगीकरण कक्षामध्ये दाखल असलेल्या ३६ रुग्णांची माहिती घेऊन त्याचा सविस्तर अह्वाल वाईच्या प्रांताधिकारी संगीता चौगुले राजापूरकर यांना देऊन त्यांनी तातडीने शिरगाव संपूर्णपणे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले.

    शिरगाव ता. वाई या गावामध्ये शासनाचे आरोग्य उपकेंद्र असूनदेखील दुर्दैवाने या केंद्रातील यंत्रणा अपुरी पडल्यामुळे जानेवारी महिन्यापासून एकूण कोरोनाबाधित रुग्ण १८४, सध्याचे पाँझीटीव्ह रुग्ण ४२, हाय रिस्क तपासणी रुग्ण २६५, लो रिस्क तपासणी रुग्ण ११० तर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिरगाव येथे ग्रामपंचायत मार्फत उभारण्यात आलेल्या विलगीकरण कक्षामध्ये ३६ रुग्ण दखल झाले आहेत. त्यापैकी ग्रामीण रुग्णालयात २, गीतांजली हॉस्पिटल १, पतंगे रुग्णालय १, जम्बो सातारा १, मँप्रो रुग्णालय १ असे एकूण ४२ रुग्ण या गावात सापडल्याने व आजअखेर गावातील ८ जणांचा मृत्यू झाल्यामुळे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांनी तातडीने घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन भेट देऊन पाहणी केली. त्यानंतर वाई वाठार रस्त्यावरील रामोशी वस्तीमध्ये २० बाधित रुग्ण, बसस्थानकावर ६ बाधित रुग्ण व गावात १२ ते १३ बाधित रुग्ण सापडल्याची माहिती वरील दोन्ही जबाबदार अधिकाऱ्यांनी घेतली.

    कोरोनाने या गावात घातलेला धुमाकूळ थांबविण्यासाठी गावातील किराणा , कापड दुकान, पीठ गिरणी, हॉटेल, चिकन सेंटर, सलून, डंख, दुध डेअरी, व्यावसायिक चालक व शेतमजूर या सर्वांनी गाव सोडून जाऊ नये यासाठी लॉकडाऊनचे आदेश तहसीलदार रणजीत भोसले यांनी आज गावामध्ये गटविकास अधिकारी उदय कुसुरकर यांच्या समवेत प.स. सदस्य मधुकर भोसले, सरपंच उज्वला भोसले, उपसरपंच दीपक शिंदे, आपत्ती व्यवस्थापन समिती उपाध्यक्ष गावकामगार तलाठी घम्ब्रे,ग्रामपंचायत सदस्य रमेश शिंदे, रघुनाथ भोसले, अमोल जेधे, नीलम भोसले, मंगल भोसले, दैवता भोसले, माजी सरपंच दीपक तोडरमल, नितीन भोसले, डॉ. सचिन राठोड, पोलीस पाटील उज्वला भोसले, ग्रामसेवक एस. आर. राऊत यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन आजपासून हे गाव पूर्णपणे लॉकडाऊन करण्याचे आदेश दिले.

    गावातील सर्व व्यवहार व व्यवसाय आजपासून ११ जुलैपर्यंत पूर्णत: बंद ठेवण्यात येणार असल्याचे आपत्ती व्यवस्थापन समिती शिरगाव व ग्रामपंचायत आदेशानुसार बंद राहणार आहेत. लॉकडाऊन काळात घराच्या विनामास्क बाहेर पडल्यास ५०० रुपये दंडात्मक कारवाई व नियमांचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.