अनोखी भेट म्हणून अजित पवारांचा वाढदिवस दरवर्षी साजरा करणार : संदीप मांडवे

    वडूज : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त नागाचे कुमठे ता. खटाव येथील भावलिंग डोंगर टेकडीवर तीन वर्षांपूर्वी २२ जुलै २०१८ रोजी जिल्हा परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष संजीवबाबा नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते आणि औंध येथील राजाभगवंतराय हायस्कूलचे विद्यार्थी यांच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम करण्यात आला होता. यावेळी सुमारे २५०० वृक्षांचे वृक्षारोपण करण्यात आले होते. बहुतांशी सर्व झाडांचे वनविभाग आणि ग्रामस्थांच्या वतीने संगोपन केले आहे.

    या झाडांचा आणि अजित पवारांचा वाढदिवस केक कापून साजरा करून ही अनोखी भेट वाढदिवसानिमित्त अजित पवार यांना दरवर्षी देणार असल्याचे खटाव पंचायत समितीचे माजी सभापती संदीप मांडवे यांनी नागाचे कुमठे येथे सांगितले.

    अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त झाडांचा वाढदिवस आयोजित कार्यक्रमात मांडवे बोलत होते. तालुका वन अधिकारी शीतल फुंदे यांच्या हस्ते केक कापून प्रातिनिधिक स्वरूपात तीन वर्षांच्या झाडांचा वाढदिवस साजरा करण्यात आला. कार्यक्रमास वनविभागाचे जावडे, जावेद, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग, सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामस्थ यांची उपस्थिती होती.