स्वच्छतेच्या नावाखाली पालिकेची तिजाेरी साफ; नगरसेवक अमोल मोहिते यांचा आरोप

    सातारा : घंटा गाड्यांवरील गीतामुळे निर्माण झालेल्या सातारा नगरपालिकेच्या अस्तित्वापेक्षाही सातारा विकास आघाडीच्या काळातील भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या बजबजपूरीने बरबटलेल्या कारभाराचा गवगवा अधिक झाल्यानेच सातारा नगरपालिकेचे नाव सर्वदूर पोहोचले आहे. कोविड प्रतिबंधित लसीकरण कार्यक्रम अंमलबजावणीत काडीचे योगदान नसणारी सातारा विकास आघाडी ही निवडणुकीच्या तोंडावर केवळ पेपरबाजी करीत आहे. सातारा विकास आघाडीने स्वच्छतेच्या नावाखाली आख्या नगरपालिकेच्या तिजोरीचाच सुफडा साफ केल्याचा आराेप नगर विकास आघाडीचे पक्ष प्रतोद व नगरसेवक अमोल मोहिते यांनी केला.

    आता हंडे मोर्चे निघत नाहीत

    साताऱ्यात आता हंडे मोर्चे का निघत नाहीत, याची पार्श्वभूमी जाणून घेवून उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी अभ्यास करण्याची गरज आहे. स्वर्गीय श्रीमंत छत्रपती अभयसिंहराजे भोसले तथा भाऊसाहेब महाराज यांच्या दूरदृष्टीमुळे सातारा शहराला नवसंजीवनी ठरलेली शहापूर पाणी पुरवठा योजना आकाराला आली. ही योजना खर्चीक असल्याची ओरड तुमच्या नेत्यांनी केली होती. या योजनेमुळेच सातारकरांचा पाणी पुरवठा सुरळीत झाला. हे मात्र तुम्ही सोईस्कररित्या विसरलात.

    नंतरच्या काळात शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या शासन पातळीवरील सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे आणि प्रयत्नामुळेच कास धरण उंची वाढीचा प्रश्न मार्गी लागला. कासच्या उंची वाढ प्रस्तावास मंजूरी मिळवून देण्याबरोबरच त्यानंतर रखडलेल्या कामांना निधी मिळवून देण्याचे कामही शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यामुळेच झाल्याने सातारकर नागरिकांवर हंडे मोर्चे काढण्याची वेळ आली नाही, असे मोहिते म्हणाले.

    किती निधी आणला, हे जाहीर करा

    नगर पालिकेत मर्जीतल्या ठेकेदारांनाच काम मिळावे यासाठी चार चार वेळा निविदा काढून केलेला निविदा कामातील भ्रष्टाचार, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सभापती यांच्यासह सातारा विकास आघाडीतील कोणाकोणाला किती टक्केवारी द्यावी लागते हे तुमचेच नगरसेवक जाहीररित्या आरोप करीत असतात. एकमेकांची उणीदुणी काढण्यात आघाडीवर असलेली सातारा विकास आघाडी असाच लौकिक तुम्ही मिळवला आहे. कोट्यवधीच्या विकास कामांच्या बाता मारणाऱ्यांनी हद्दवाढीत नव्याने समावेश झालेल्या भागासाठी किती निधी आणला हेही जाहीर करावे, असे मोहिते यांनी म्हटले आहे.