आमच्या कुटुंबीयांवरील आरोप तथ्यहीन : पांडुरंग पाटील

  कराड : आमच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेले सर्व आरोप हास्यास्पद व तथ्यहीन आहेत. न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल. मुळात आदिती या गेल्या दोन वर्षांपासून माहेरीच आहेत. आम्ही वारंवार विनंती करूनही त्या सासरी आल्या नाहीत. आमचे घराणे राजकारणात आहे आणि आमची वर्तणूक समाजात सर्वश्रूत असल्याचा खुलासा कोल्हापूरचे आमदार पांडुरंग पाटील (Pandurang Patil) यांनी माध्यमांशी बोलताना केला आहे.

  दोन वर्षापूर्वी झालेल्या सासरच्या अत्याचाराबद्दल कराड पोलिसात दाखल झालेल्या तक्रारी वरून पश्चिम महाराष्ट्रातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले आहे. तब्बल दोन वर्षानंतर दाखल झालेल्या तक्रारीबाबत संबंधितांनी खुलासा केल्याने या प्रकरणाची चांगलीच चर्चा रंगली आहे. कराडमध्ये चार दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाली. मात्र, या तक्रारीची माहिती माध्यमांना उशिरा मिळाली.

  दोन वर्षांपूर्वी म्हणजेच मे 2017 ते नोव्हेंबर 2019 या काळात आपला मानसिक व शारीरिक छळ करुन दमदाटी करीत माहेरहून एक कोटी रुपये आणावेत यासाठी छळ केल्याची तक्रार कराड शहर पोलीस ठाण्यात 9 सप्टेंबरला कराडच्या आदिती पाटील यांनी केली आहे. त्यानुसार कोल्हापूर येथील त्यांचे सासरे (पांडूरंग पाटील), पती (राजेश पाटील),व नणंद (टिना पाटील) या तिघां विरोधात कराड पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

  दरम्यान, गुन्हा दाखल झालेले अदितीचे सासरे कोल्हापूरचे आमदार पांडूरंग पाटील यांनी माध्यमांशी बोलताना या प्रकरणाचा खुलासा केला आहे.

  ते म्हणाले, आमच्या कुटुंबीयांवर करण्यात आलेले सर्व आरोप हास्यास्पद व तथ्यहीन आहेत. न्यायदेवतेच्या मंदिरात आम्हाला न्याय मिळेल. मुळात आदिती या गेल्या दोन वर्षांपासून माहेरीच आहेत. आम्ही वारंवार विनंती करूनही त्या सासरी आल्या नाहीत. आमचे घराणे राजकारणात आहे आणि आमची वर्तणूक समाजात सर्वश्रूत आहे. राजेश आणि आदिती यांचा आम्ही विवाह थाटात करून दिला होता. आम्ही सर्वजण आनंदात होतो. मात्र, या सगळ्याला आदितीने गालबोट लावले.

  गेल्या दोन वर्षांपासून त्या आम्हाला त्रास देत आहेत. त्या सहा सहा महिने माहेरी राहत होत्या. तसेच त्या आमच्या कुटुंबाशी मनमोकळ्यापणे राहिल्या नाहीत. परदेशात न सांगता जात होत्या. अलिकडे त्या माहेरीच होत्या. मे महिन्यात आम्हाला नोटीस आली. आम्ही काय त्रास दिला हे विचारले असता त्याबाबतही काही सांगितले नाही. त्यानंतर मी तिचे काका पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांना जाऊन भेटलो. पण त्यांनीही त्यांच्या भाऊ आणि पुतणीला समजावण्यात असमर्थता दर्शविली.

  आम्ही आमच्या परीने समजावण्याचा प्रयत्न केला. तरीही आदिती या ऐकण्यास तयार नाहीत. त्यानंतर आम्ही वकिलांना पाठवून समजावून सांगितले. घटस्फोट हवा आहे का? असे विचारले असता त्यांनी त्यालाही नकार दिला. मला केवळ सासरच्या लोकांना त्रास द्यायचा आहे, असे आदिती यांनी वकिलांना सांगितले. यावरून त्यांचा हेतू लक्षात येतो. आमच्या परीने प्रयत्न केले आहेत. मात्र, त्यांना आमच्या कुटुबीयांना त्रासच द्यायचा असेल तर आता न्यायदेवता आम्हाला न्याय देईल.

  या प्रकराणातील आदिती या सहकार मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांची पुतणी व कराड नगरपालिकेतील लोकशाही आघाडीचे माजी अध्यक्ष व माजी उपनगराध्यक्ष सुभाष पाटील यांची कन्या आहेत. तर सासरे पांडूरंग पाटील हे काॅंग्रेसचे कोल्हापूरच्या करवीर मतदारसंघाचे आमदार आहेत. पती राजेश हे एका बॅंकेचे चेअरमन आहेत तर नणंद ही कराडातील मार्केटयार्ड परिसरात राहणाऱ्या एका प्रसिध्द बांधकाम व्यावसायिक बिल्डरची पत्नी आहेत.