रस्त्यांच्या टेंडरवरून सत्ताधारी व विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप; अविनाश कदम यांची नगरविकास मंत्र्यांकडे तक्रार

    सातारा : कमी दराच्या निविदा रद्द करून ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याच्या प्रकारामध्ये सातारा पालिकेचे पन्नास लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पालिकेचे पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी संगनमताने हा प्रकार केला असून, या प्रकरणाची चौकशी व्हावी, अशी लेखी तक्रार नगर विकास आघाडीचे नगरसेवक अविनाश कदम यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली आहे.

    कदम यांनी दाखल केलेल्या तक्रार अर्जात नमूद आहे की, सातारा पालिकेने 6 एप्रिल 20 21 रोजी सातारा शहरातील 13 रस्त्यांच्या ई निविदा प्रसिद्ध करण्यात आल्या होत्या. एका ठेकेदाराने प्रस्तुत दराच्या कमी किमतीने निविदा भरलेली असताना मी काम करू शकणार नाही, असे पत्र ठेकेदाराकडून घेण्यात आले. ही निविदा रद्द करताना सक्षम समितीची मंजुरी व शुध्दीपत्रक प्रसिद्ध करणे अपेक्षित असताना ती प्रक्रिया करण्यात आली नाही. या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची प्रक्रिया सुरू असताना याच ठेकेदाराची दुसरी निविदा परस्पर उघडण्यात आली. हे बेकायदा प्रकार अधिकारी व पदाधिकारी यांच्या संगनमताने झाला. एकीकडे कमी दराने काम करणारे ठेकेदार नाकारायचे अन् दुसरीकडे ज्यांची काम करायची क्षमता नाही, अशा ठेकेदारांच्या गळ्यात कामे मारायची असा विरोधाभास नगरपालिकेत सुरू आहे. या प्रकरणात सातारा पालिकेचे तब्बल पन्नास लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी कदम यांनी केली आहे.

    सातारा शहरातील रस्त्यांची निविदा प्रक्रिया पारदर्शक पध्दतीने राबविण्यात आली आहे. संबंधित ठेकेदारानेच आपण काम करू शकत नसल्याचे पत्र त्याच्या लेटरहेडवर दिले आहे. मात्र, निविदा प्रक्रियेत कोणत्याही नियमांचा भंग झालेला नाही. साताऱ्यात दर्जेदार रस्ते व्हावेत यासाठी खासदार उदयनराजे भोसले सातत्याने आग्रही राहिले आहेत. विरोधकांनी केलेल्या कोणत्याही आरोपाला आम्ही उत्तर देण्यास तयार आहोत, अशी प्रतिक्रिया उपनगराध्यक्ष मनोज शेंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना दिली आहे.