दगड-माती उत्खननास परवानगी द्या; वडार समाज बांधवांची मागणी

    कराड : बांधकामासाठी खाणीतून दगड घडवून उदरनिर्वाह करणे, हा वडार समाजाचा मूळ व्यवसाय आहे. मात्र, कोरोना, लॉकडाऊन, महागाई आदी. संकटे समोर टाकली असतानाही दगड-माती उत्खननास परवानगी नसल्याने समाजावर उपासमारीची वेळ आहे. याची दखल घेऊन प्रशासनाने तात्काळ समाजाला दगड-माती उत्खननास परवानगी द्यावी, या मागणीसाठी शुक्रवारी येथील तहसील कार्यालयावर गाढव मोर्चा काढला. मोर्चात नांदलापूर, पाडळी-केसे येथील वडार समाज बांधवांनी सहभाग घेतला.

    यावेळी, प्रभारी तहसीलदार आनंदराव देवकर यांना आपल्या मागणीचे निवेदन देण्यात आले. यावेळी कासासाहेब चव्हाण, जयवंत पवार, सूर्यकांत पवार, शुभम कुसाळकर, किरण धोत्रे, किशोर चव्हाण यांच्यासह अनेक समाजबांधव उपस्थित होते.

    तहसीलदारांना चुकीचा अहवाल

    निवेदनात म्हटले आहे की, नांदलापूर व पाडळी-केसे (ता. कराड) येथील खाणपट्यातून दगड-माती उत्खननास परवानगी देण्यात यावी, अशी वडार समाजाच्यावतीने मागणी करण्यात आली होती. मात्र, या खाणपट्याची मोजणी झाली नसल्याबाबतची माहिती तहसीलदारांना कळवण्यात आली आहे. परंतु, त्यांची मोजणी झाली असून याबाबतचा उल्लेखही पत्रामध्ये करण्यात आला आहे. तहसीलदारांना चुकीचा अहवाल दिला जात असल्याचेही वडार समाजाने निवेदनात म्हटले आहे.

    चुकीच्या अहवालामुळे प्रशासनाकडून समाजाला दगड-माती उत्खननास परवानगी नाकारण्यात येत आहे. त्यामुळे वडार समाजावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासनाच्या या चुकीच्या निर्णयाविरोधात आम्हाला गाडवांसह मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. याची योग्य दखल घेऊन प्रशासनाने नांदलापूरसह पाडळी-केसे येथील खाणपट्यातून दगड-माती उत्खननास परवानगी द्यावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.