आंबेनळी घाट तब्बल दीड महिन्यानंतर खुला ; प्रतापगड परिसरातील बावीस गावांशी संपर्क स्थापित

जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे अंबनेळी घाट रस्ता अनेक ठिकाणी तुटून दरीत कोसळला होता. अनेक ठिकाणी या रस्त्यावर दरडी कोसळल्याने २१ जुलैपासुन या घाटातून वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक बंद झाल्याने किल्ले प्रतापगडासह या भागातील २२ गावांचा सातारा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता.

    सातारा : तब्बल ४८ दिवसांच्या प्रतिक्षेनंतर मंगळवारपासून अंबेनळी घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. पुढील काही दिवस या घाटातून हलक्या चारचाकी वाहनांसाठी हा घाट रस्ता खुला करण्यात आला असून, जड वाहनांना या घाटातून वाहतुकीसाठी बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान हा घाट वाहतुकीसाठी खुला करण्यात आल्याने किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याला असलेली २२ गावे पुन्हा सातारा जिल्ह्याला जोडली गेल्याने ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

    जुलै महिन्यातील अतिवृष्टीमुळे अंबनेळी घाट रस्ता अनेक ठिकाणी तुटून दरीत कोसळला होता. अनेक ठिकाणी या रस्त्यावर दरडी कोसळल्याने २१ जुलैपासुन या घाटातून वाहतूक बंद करण्यात आली होती. वाहतूक बंद झाल्याने किल्ले प्रतापगडासह या भागातील २२ गावांचा सातारा जिल्ह्याशी असलेला संपर्क तुटला होता. या २२ पूरग्रस्त गावात मदत पोहचविण्यासाठी प्रशासनास कोकणातील दोन जिल्हे पार करून साधारण ३०० कि.मीचा प्रवास करून मदत पोहचविण्याचे काम करावे लागत होते. काही वेळा १४ कि. मी डोंगर उतरून या भागातात पोहचावे लागले. घाटातील वाहतूक बंद झाल्याने सातारा जिह्यातून कोकणात जाणारी भाजीपाल्यांची वाहतूक बंद पडली होती तर किल्ले प्रतापगडावरील पर्यटन बंद पडले होते.

    या घाटातील रस्त्याची दुरूस्तीचे काम सार्वजनिक बांधकाम विभागाने हाती घेऊन मुसळदार पावसात, दाट धुके अशा प्रतिकुल परिस्थितीत शासनाच्या मदती शिवाय हे काम सुरू ठेवले. सदर काम ४५ दिवसात पुर्ण झाले आहे. आज प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाची पाहणी केल्यानंतर घाट वाहतुकीसाठी खुला करण्याचा निर्णय घेतला.