हातचलाखी करणाऱ्या कुरिअर डिलीव्हरी बॉयची आंतरराज्य टोळी गजाआड ; कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची कारवाई , पाच जणांना अटक

    कराड : कुरिअर डिलिव्हरी बाॅयची हातचलाखी करून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्य टोळीला कराड गुन्हे अन्वेषण शाखेने अटक केली आहे. या पाच आरोपींसह त्यांच्याकडून दोन कार, १ लॅपटॉप, ८ मोबाईल, १४ वेगवेगळी आधार कार्ड, फसवणूकीकरता वापरण्यात येणारे साहित्य असा एकूण ५ लाख २६ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात कराड पोलिसांना यश आहे.

    पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. ४ सप्टेंबर २०२१ रोजी संशियत आरोपींनी कराड शहरात ५ ठिकाणी मोबाईलची ऑर्डर मागवली होती. ऑर्डर स्वीकारताना अर्धे सुट्टे पैस देवून कुरीअर डिलीव्हरी बॉय यांना पैसे मोजण्यात व्यस्त ठेवून ॲमेझोन पार्सलमधील ऑर्डरचे मोबाईल हातचलाखीने काढून घेवून त्याठिकाणी रिन साबण, व्हिल साबण, पार्ले बिस्कीटचे रिकाम्या बॉक्समध्ये ठेवून एकूण १ लाख ६९ हजार ९६७ रूपयांची फसवणूक केल्याची तक्रार अभिजीत नितीन मोहिते यांनी दिली होती.

    सदर गुन्ह्याच्या तपासात संशयीत आरोपींना पार्सल मागवण्याकरीता स्वत:चे बोगस पत्ते व बोगस सीमकार्डचा वापर केल्याचे निष्पन्न झालेे. सदर गुन्हा उघड करणे व आरोपींना पकडणे हे कराड पोलिसांसमोर कडवे आव्हान होते. तांत्रिक माहितीचा अभ्यास करून प्रथम घडलेला प्रकार हा एक दोन इसमांनी केला नसून त्यामध्ये मोठी टोळी कार्यरत असल्याचे आढळून आले. या तपासामध्ये विविध तपास कौशल्यांचा वापर करून कराड डीबी पथकाने संशयीत पाच आरोपींना निष्पन्न केले.

    संशयितांनी गुन्ह्याची कबुली दिली असून प्रथम गुगल वरून आधारकार्ड डाऊनलोड करून ते मोबाईलवर एडिट करून प्रथम बोगस आधारकार्ड बनवल्याचे सांगितले. त्यानंतर त्या आधारकार्डांचा वापर करून बोगस सिमकार्ड खरेदी केली. त्या सीमकार्डांचा वापर करून ॲमेझॉन, फ्लिपकार्ड, रेडमी, विवो स्टोअरवर खाती सुरू करून त्या खात्यांवरून ऑनलाइन ऑर्डर मागवत होते. असा ऑर्डर केलेला मोबाईल मेसेज आल्यानंतर संबंधीत डिलेव्हर बॉयला सुट्टे पैसे मोजण्यास देवून हातचलाखी करून मुळ पार्सलमधील मोबाईल काढून घेवून त्यामध्ये साबणाचा बॉक्स टाकण्यात येत होता. सदरचा साबणाचा बॉक्स टाकत असताना आलेल्या मोबाईल पार्सलचे वजन व बदलून टाकलेल्या साबणाचा बॉक्सचे वजन तंतोतत जुळवले जात होते.

    सदरची कामगिरी पोलिस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलिस अधीक्षक अजीत बोऱ्हाडे, उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. रणजीत पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी.आर.पाटील यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे प्रमुख सहा.पोलिस निरीक्षक अमित बाबर , स.फौ संतोष सपाटे, सतीश जाधव, पो. हवालदार जयसिंग राजगे, नितीन येळवे, पो. ना. संजय जाधव, सचिन साळुंखे, मारूती लाटणे, संदीप कुंभार, प्रफुल्ल गाडे, आनंदा जाधव, संग्राम पाटील, सुजीत दाभाडे यांनी केलेली आहे.

    बदलापूर आणि ठाण्यातून अटक
    गुन्ह्यात एकुण ५ निष्पन्न आरेापी यांना बदलापूर , कल्याण जिल्हा ठाणे येथून अटक केली असून आरोपी यांचेकडून २ मोटार कार, २ लॅपटॉप, ८ मोबाईल, १४ वेगवेगळी आधारकार्ड व फसवणूकीसाठी वापरण्यात येणारे साहित्य हस्तगत करण्यात आलेले आहे. आरोपी हे त्यांनी बनविलेल्या बोगस आधारकार्डवरच हॉटेलमध्ये वास्तव्य करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी यांचेकडून एकूण ५ लाख २६ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केलेला आहे.

    हात सफाई करणारे उच्चशिक्षित
    संशयितांनी या गुन्ह्यासह महाराष्ट्रात पुणे, कल्याण-ठाणे, दादर-मुंबई, नंदुरबार, अलिबाग-रायगड जिल्ह्यात व इतर राज्यात इंदौर-मध्यप्रदेश, भोपाळ-मध्यप्रदेश, कन्नुर-केरळ, गोवा याठिकाणीही असे प्रकार केलेचे कबुली दिलेली आहे. नमुद टोळीतील काही सदस्य उच्चशिक्षित आहेत. ते त्यांना असलेल्या तांत्रिक ज्ञानाच्या वापर करून फसवणूकीचे प्रकार करत असल्याचे निष्पन्न झाले आहे. नमुद टोळीचे पुढील टार्गेट उरळीकांचन पुणे होते. तेथेही मोबाईलची पार्सल मागविले होते. परंतु, त्यापुर्वीच कराड पोलिसांनी त्यांच्या मुसक्या आवळत फसवणुकीचे साहित्य जप्त केले आहे.

    अशी आहेत संशयितांची नावे
    संशयित आरोपीमध्ये रॉबिन ॲन्थांनी आरोजा (वय २६) मूळ रा. घर नंबर ०५३ कुचेकल कोचीण राज्य केरळ सध्या रा.गणेशकृपा, प्लॅट नंबर 303, जाधव कॉलणी बदलापूर जि. ठाणे, किरण अमृत बनसोडे (वय २४) रा.चक्कीनाका, गोसावीपुरा, हाजीमलंग रोड, कल्याण पुर्व, राहूल मच्छिंद्र राठोड (वय २१) रा.गणेशकृपा, प्लॅट नंबर ३०३, जाधव कॉलणी बदलापूर, रॉकी दिनेश कर्णे (वय २१) रा.काकाढाबा गणेश चौक, मलंगबाब रोड कल्याण जि. ठाणे, गणेश ब्रम्हदेव तिवारी (वय ३९,) रा. भटवाडी घाटकोपर मुंबई यांचा समावेश असून त्यांना शुक्रवारी पहाटे पोलिसांनीअटक केली. न्यायालयात हजर केले असता आज रोजीपर्यंंत पोलीस कस्टडी देण्यात आली आहे.