अण्णांचा जेलफोडो प्रसंग देशासाठी आदर्शवत; साताऱ्यात स्मृतीस्तंभास अभिवादन

  सातारा : ‘भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा इतिहास, सहभागी माणसे आपल्यासाठी आदर्श आहेत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरु असतानाच पद्मभूषण, क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडी यांचीही जन्मशताब्दी सुरु आहे. अण्णांनी सातारा जेल फोडून ब्रिटिश व्यवस्थेला धक्का दिला. आपल्यासाठी अतिशय अभिमानास्पद आणि आदर्शवत असा हा प्रसंग आहे,’ असे गौरवोद्गार वाळवा येथील हुतात्मा संकूलाचे सर्वेसर्वा वैभव नायकवडी यांनी काढले.

  भारतीय स्वातंत्र्य लढ्यात क्रांतिवीर नागनाथअण्णा नायकवडींनी मोलाचे योगदान दिले आहे. ब्रिटिशांनी त्यांना कैद करुन सातारा जेलमध्ये ठेवले होते. मात्र, १० सप्टेंबर १९४४ रोजी त्यांनी जेलच्या भिंतीवरून उडी मारून पलायन करत ब्रिटीशांना झटका दिला होता. त्या घटनेला शुक्रवारी (दि. १०) ७७ वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने सांगली जिल्ह्यातील वाळवा येथील हुतात्मा सहकारी साखर कारखाना, हुतात्मा शिक्षण संकूल, हुतात्मा परिवाराच्या वतीने सातारा येथे ‘जेलफोडो शौर्य दिन’ साजरा करुन जेल बाहेर असणाऱ्या स्मृतीस्तंभास अभिवादन करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.

  या अभिवादन कार्यक्रमास रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉ. अनिल पाटील, पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अतिरिक्त जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, शिराळा पंचायत समितीचे उपसभापती बी. के. नायकवडी, वीरधवल नायकवडी यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान, जेलफोडो शौर्यदिन कार्यक्रमाच्यावेळी भारतीय स्वातंत्र्यलढ्याचा विजय असो, प्रतिसरकारचा विजय असो, पद्मभूषण नागनाथअण्णा जिंदाबाद, क्रांतिसिंह नाना पाटील जिंदाबाद, हुतात्मा किसन अहिर जिंदाबाद, हुतात्मा नानकसिंग जिंदाबाद आदी घोषणांनी सातारा शहर पोलीस ठाणे आणि जिल्हा कारागृह परिसर उपस्थितांनी दणाणून सोडला.

  वैभव नायकवडी म्हणाले, ‘भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईत हजारो तरुण सहभागी झाले होते. प्रत्येकजण जीवाची पर्वा न करता लढत होता. आता थांबायचे नाही असा ध्यास मनी बाळगत भारत स्वतंत्र झालाच पाहिजे या ध्येयाने हजारो भारतीय तरुण पछाडले होते. त्यांच्या लढाईला यश आले. त्यांच्या योगदानामुळेच आपण स्वतंत्र भारतात सुखाने नांदत आहे.’

  डॉ. अनिल पाटील म्हणाले, ‘क्रांतिवीर नागनाथअण्णा, आणि रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीरअण्णा हे एक अनोखे नाते होते. या दोघांचे कतृर्त्व भारताच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहायला हवे. त्यांच्या कतृर्त्वाला आमचा सलाम आहे.’
  अजयकुमार बंसल म्हणाले, ‘सातारची भूमी अन्यायाविरोधी लढणारी आहे. स्वराज्य निर्मितीची खरी लढाई याच भूमीतून सुरु झाली. क्रांतिसिंह नाना पाटील यांची प्रतिसरकार चळवळ ब्रिटिशांविरोधात आक्रमकपणे उभी राहिली, लढली. नागनाथअण्णांचे यामध्ये मोठे योगदान आहे.’

  बी. के. नायकवडी, विजय मांडके यांची भाषणे झाली. यावेळी गणेश दुबळे, सुनेत्रा भद्रे, भगवानराव पाटील, बाळासाहेब पाटील, प्रा. विलास ढगे, अजित वाझे, संभाजीराव थोरात, दादासाहेब चव्हाण, सुभाष मोटे, आनंदराव सुर्यवंशी, जनसंपर्क अधिकारी शिवाजी पाटील, प्रदीप पवार, रमेश आचरे, प्रा. हसीम वलांडकर, जयकर चव्हाण, पोपट फाटक, आनंदराव चव्हाण, दत्ता जाधव, शरद खोत, अरुण यादव आदी उपस्थित होते. विजय मांडके यांनी प्रास्ताविक केले.