Arrest

    लोणंद / प्रतिनिधी : पुणे जिल्ह्यातील मंगेश सुरेश पोमण (वय ३५, रा.पोमणनगर पिंपळे ता. पुरंदर) याचा खून करून मृतदेह खंडाळा तालुक्यातील वाठार बुद्रुक येथे निरा ऊजव्या कालव्यात टाकून देणारा दुसरा संशयित ऋषिकेश दत्तात्रय पायगुडे (रा. कुडजे ता. हवेली जि. पुणे) यांच्या मुसक्या लोणंद पोलिसांनी नाशिक येथे आवळल्या. लोणंद पोलिसांकडून ही माहिती देण्यात आली.

    या प्रकरणातील आणखी एक संशयित वैभव सुभाष जगताप (वय-२८, रा. पांगारे ता. पुरंदर जि.पुणे) याला दोन दिवसांपूर्वीच अटक केली आहे. येरवडा कारागृहात शिक्षा भोगत असताना मंगेश पोमण तसेच वैभव जगताप आणि ऋषिकेश जगताप या तिघांची वादावादी झाली होती. दरम्यान, हे तिघेही जामिनावर सुटले होते. यानंतर वैभव व ऋषिकेश या दोघांनी मंगेश याचा खून करुन त्याचा मृतदेह वाठार बुद्रुक येथील निरा उजव्या कालव्यात फेकून पूरावा नाहीसा केला होता. याचा तपास सुरू असताना आणि संशयिताची माहिती पुढे आल्यानंतर पोलिसांकडून त्याचा शोध घेतला जात होता. वैभव याला अटक केल्यानंतर त्यानी खुनाची कबुली देतच यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याची माहिती दिली होती.