कराडला रंगकर्मींची नांदी करून आंदोलन

    कराड : यशवंतराव चव्हाण नाट्यगृहात कराड व पाटण तालुक्यातील रंगकर्मींनी रंगदेव तिची पूजा व नांदी करून आंदोलन केले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सांस्कृतिक कार्यक्रम बंद असल्याने कलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे. हे कार्यक्रम पूर्ववत सुरू व्हावेत यासाठी हे आंदोलन करण्यात आले.

    गेले दीड वर्ष कोरोना महामारी संकटामुळे गर्दी करण्यावर बंदी आहे. त्यामुळे नाटक, चित्रपटगृह, तमाशा आदी कार्यक्रम बंद आहेत. मात्र, त्यामुळे कलाकारांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा परिस्थितीत शासन त्यांची कुठलीही दखल घ्यायला तयार नाही. ही दखल घ्यावी म्हणून शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हे अनोखे आंदोलन शुक्रवारी करण्यात आले.

    यावेळी रंगकर्मींनी बंद नाट्यगृहाच्या कुलपाची आरती केली. त्याचबरोबर रंगमंचावर रंग देवतिची पूजा केली. त्यानंतर नांदी म्हणून हे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात जुगलकिशोर ओझा, चित्रपट दिग्दर्शक वासू पाटील, संजय पाटील, जितेंद्र मगरे, प्रमोद गरगटे, प्रशांत कुलकर्णी, ऍड. अनिता वरेकर आदी कलाकारांनी सहभाग घेतला.