कराडात मानधनासाठी आशा स्वयंसेविकांचे कामबंद आंदोलन

आशा स्वयंसेविका पंचायत समितीच्या वतीने 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा, थकित मानधन तात्काळ मिळावे, लसीकरण व कोरोना टेस्टिंगचा कोणताही मोबदला मिळत नसल्याने सदरचे काम आशा सेविकांना देण्यात येऊ नये, गटप्रवर्तकांनाही कोविड लसीकरण डाटाएन्ट्रीच्या कामचा मोबदला देण्यात येत नसून मोबदला मिळाल्याशिवाय सदरचे काम ते करणार नाहीत, अशा मागण्याची या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.

    कराड : गेल्या चार महिन्यांपासून केंद्र व राज्य सरकारकडून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना कोणतेही मानधन दिले गेलेले नाही. याच्या निषेधार्थ तालुक्यातील आशा स्वयंसेविकांनी आज बुधवारपासून कामबंद आंदोलन पूकारले आहे. तसेच आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना त्यांच्या कामाचा संपूर्ण मिळेपर्यंत सदर आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचा इशाराही आशा व गटप्रवर्तक संघटनेने दिला आहे.येथील प्रशासकीय इमारतीसमोर बुधवारी १३ रोजी सकाळी कराड तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी कामबंद आंदोलन सूरू केले. त्यानंतर त्यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन प्रशासनास दिले.यावेळी यूनियनच्या अध्यक्षा आनंदी अवघडे, अर्चना पवार, तेजश्री घाडगे, लतिका शिवथरे, पुनम रवीढोणे, भाग्यश्री पाटील, सारिका शिरतोडे, वैशाली शेजवळ, सुवर्णा पाटील, शीला साळुंखे, सविता पवार, भाग्यश्री कोळेकर, उषा थोरात, दीपा जाधव, निर्मला माने, रूपाली बांईग यांच्यासह आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    सदर निवेदनात म्हटले आहे की, सध्या कराडसह तालुक्यात 475 आशा स्वयंसेविका आणि 25 गटप्रवर्तक कार्यरत आहेत. यांनी कोरोना कालावधीत नियमित कामांसह इतरसर्व कामे केली आहेत. मात्र, गेल्या चार महिन्यांपासून आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना केंद्र व राज्य सरकारकडून मिळणारे मानधन अद्यापही अदा करण्यात आलेले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व आशा व गटप्रवर्तक महिलांनी कामबंद आंदोलन पुकारण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच थकित मानधन त्वरित देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रशासनाकडे केली आहे.

    त्याचबरोबर आशा स्वयंसेविका पंचायत समितीच्या वतीने 2 हजार रुपये दिवाळी बोनस देण्यात यावा, थकित मानधन तात्काळ मिळावे, लसीकरण व कोरोना टेस्टिंगचा कोणताही मोबदला मिळत नसल्याने सदरचे काम आशा सेविकांना देण्यात येऊ नये, गटप्रवर्तकांनाही कोविड लसीकरण डाटाएन्ट्रीच्या कामचा मोबदला देण्यात येत नसून मोबदला मिळाल्याशिवाय सदरचे काम ते करणार नाहीत, अशा मागण्याची या निवेदनाद्वारे करण्यात आल्या आहेत.