अहिल्या शिक्षण ‘पतसंस्थेच्या’ चेअरमनपदी अशोक पडळकर

    म्हसवड‌ : आटपाडी तालुक्यातील झरे येथील जवाहरलाल नेहरू विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय झरेचे प्राचार्य अशोक सिदू पडळकर यांची अहिल्या शिक्षण संस्थेच्या सेवकांच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली आहे. त्यांनी संस्थेत गेली २९ वर्ष अध्यापनाचे व संस्था वाढीसाठी प्रामाणिक काम करून संस्थेचा नावलौकिक वाढवण्यासाठी मोठ्या प्रमाणात कष्ट घेतले आहे. आज त्यांच्या प्रामाणिक कष्टाचे फळ म्हणून त्यांची सेवकांच्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी बिनविरोध निवड करण्यात आली.

    पडळकर यांनी संस्थेत प्रामाणिकपणे काम केल्याने या आधीच संस्थेने संस्थेचे संचालकपदी नेमणूक केली आहे. त्याचबरोबर संस्था तपासणी पथकाचे प्रमुख, अहिल्या वाहिनीचे सचिव, झरे विद्यालयाचे प्राचार्य अशा विविध पदावर ते कार्यरत असून, त्यांनी उत्तमरित्या या सर्व पदांना न्याय दिल्यामुळेच संस्थेने सेवक वर्गाची असलेल्या पतसंस्थेच्या चेअरमनपदी संधी दिली. एकूणच पडळकर यांच्या कार्याचा अलेख चढताच राहिला असल्याचे दिसून येते. त्याचदरम्यान पतसंस्थेच्या व्हा.चेअरमनपदी तानाजी लोखंडे यांची निवड करण्यात आली.

    यावेळी शिक्षण संस्थेच्या व्हा.चेअरमन एल.टी.शेंडगे, सचिव एस.ए.पाटील, पतसंस्थेचे मावळते चेअरमन पी.डी.शेंडगेसह पतसंस्थेचे सर्व संचालक व पदाधिकारी उपस्थित होते. या निवडीबद्दल अशोक पडळकर यांचे अहिल्या शिक्षण संस्थेचे चेअरमन आर.एस.चोपडे यांच्यासह अहिल्या परिवारातील पदाधिकाऱ्यांसह सर्व सेवक वर्गांनी अभिनंदन केले.