मुलीच्या लग्नातील खर्च वाचवून बेलोशे कुटुंबियांनी केलं ‘असं’ काही…अन् जपली सामाजिक बांधिलकी

    पांचगणी : सध्या कोरोना विषाणू संसर्गाच्या दुसऱ्या लाटेचा सामना देश करत आहे. या संकटात माणुसकीची भावना अधिक बळकट होत असल्याचं दाखवून देणाऱ्या घटना आपल्या समोर येत असतात. जावली तालुक्यातील काटवली गावातील पत्रकार रविकांत बेलोशे यांनी आपल्या मुलीच्या लग्नातील खर्चात काटकसर करून दहा हजार एक रुपये रक्कम आळंदी येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेला आणि सुमारे 20 हजार रुपयांचे आरोग्य साहित्य काटवली येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला दिले. त्यांच्या या दातृत्वाबद्दल त्यांचे परिसरात अभिनंदन होत आहे.

    पांचगणी येथील रविकांत बेलोशे यांची कन्या प्रणिता व घोटेघर तालुका जावली येथील संपत रांजणे यांचे चिरंजीव विनोद यांचा विवाह नुकताच भिलार या पुस्तकांच्या गावात पार पडला. रविकांत बेलोसे यांचे वडील कै. दिनकर कोंडीबा बेलोसे हे अध्यात्मिक क्षेत्राशी आयुष्यभर निगडित असल्याने या लग्न खर्चातील काटकसर करून उरलेले पैसे याच क्षेत्रात आळंदी येथील श्री विठ्ठल वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या मुलांच्या भवितव्यासाठी उपयोगी यावेत. म्हणून याच लग्नसमारंभात दहा हजार एक रुपयांचा निधी बेलोसे यांनी संस्थेच्या संचालिका ज्योती मतकर यांच्याकडे वधू-वरांच्या हस्ते सुपूर्द केला. याबरोबरच आरोग्य किट संस्थेसाठी देण्यात आले.

    याच पद्धतीने आपली जन्मभूमी असणाऱ्या काटवली येथील नव्यानेच स्थलांतरित झालेल्या प्राथमिक आरोग्य उपकेंद्रासाठीही बेलोसे यांनी हेल्थ प्लस मेडिकल ग्रुपचे सदस्य हणमंतराव पवार, शैलेश वैश्य, निलेश पवार, शिल्पा पवार, जितेश पवार, राहुल तिवारी यांच्या सहकार्यातून आणि भोसे येथील राधाकृपा आश्रम, स्वामी कृष्णदास राधा कृपा ट्रस्ट व ब्रिजांचल ट्रस्ट यांच्या वतीने व भाऊसाहेब दानवले यांच्या सहकार्याने सुमारे 20 हजार रुपयांचे आरोग्य किट नवरी मुलीच्या हस्ते भेट देण्यात आले.