वाई एमआयडीसी ते सुरुर वाई रस्त्याला जोडणाऱ्या रस्त्यावर खड्डेच खड्डे

    वाई : वाई सुरूर रस्त्यावरून वाईच्या एमआयडीसी कडे जाणाऱ्या रस्त्याची चाळण होऊन मोठे फूट ते दीड फुटाचे खड्डे पडल्याने चारचाकी आणी दुचाकी वाहनचालकांना वाहन चालवताना खड्डे चुकवत रस्ता शोधण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. या रस्त्यावरून दररोज शेकडो अवजड वाहनांची ये-जा होत असल्याने येथील रस्त्याचे काम निकृष्ठ दर्जाचे झाल्यामुळे सध्या या रस्त्यावरून अपघातांची मालिका सुरु असल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.

    एमआयडीसीमधून मिळालेली माहिती अशी की, वाईच्या एमआयडीसीत शेकडो विविध उद्योगपतींचे कारखाने आहेत. या कारखान्यांना मानसिक बळाची मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने या एमआयडीसीत वाई खंडाळा पाचगणी महाबळेश्वर कोरेगाव मेढा या सहा तालुक्यातील गावांमधील बहुतांशी तरूण वर्गासह महिला वर्ग हजारोंच्या संख्येने कामावर आहे. या ठिकाणी येण्या-जाण्यासाठी कामगारांना कुठलेही शाश्वत वाहन नसल्याने बहुतेक कामगार शेकडो किमीवरुन दुचाकीवरुन आपल्या मुलांचे शिक्षण आणी प्रपंचाचा गाडा चालावा, या भावनेपोटी येथे येऊन नोकरी करत असतात.

    कामगार ड्युटी संपल्यावर आपल्या दुचाकीवरुन घराकडे जाताना असणाऱ्या रस्त्यावर जवळपास पाच किमी रस्त्यावर फुट ते दीड फुटाचे मोठे खड्डे पडले आहेत. कामगारांना कामावर येताना आणि जाताना फारच घाई असते. त्यामुळे वाहने सुसाट असतात. पण सध्या पावसाळ्याचे दिवस असल्याने रस्त्यावर पडलेल्या खड्यात मुसळधार पावसाचे पाणी साटल्याने रस्ताच दिसत नसल्याने वाहने या खड्यात आदळून वाहनांचे टायर फुटून अपघातांची मालिका सुरु आहे. तर अनेकांचे टायर फुटल्याने मोठे अपघात होऊन दुचाकीस्वार जखमी होऊन अंथरुणावर पडून आहेत. हा रस्ता अनेक ठेकेदारांनी आजपर्यंत केला. पण येथील रस्त्याचे काम हे निकृष्ठ दर्जाचे झाल्याने रस्त्याची चाळण झाली.

    एमआयडीसीकडे येणाऱ्या रस्त्यावर एमआयडीसीच्या कुठल्याही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष नसल्याने दयनीय अवस्था झाली आहे. पडलेल्या खड्यांत तातडीने मुरुम भरुन तो वाहनचालकांना शाश्वत रस्ता द्यावा, अशी मागणी हजारो वाहनचालक कामगारांनी केली आहे. रस्ता तातडीने दुरुस्त न झाल्यास रस्ता रोकोसारखे आंदोलन करावे लागेल, असा इशारा कामगार वाहनचालकांसह नागरिकांनी दिला आहे.