बार्टी संपूर्ण महाराष्ट्रात राबवणार वृक्षारोपण पंधरवडा; स्मशानभूमीतच वृक्षारोपणाने प्रारंभ

    सातारा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) यांच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात समतादूत प्रकल्पाअंतर्गत ५ जून ते २० जूनपर्यंत लक्षावधी वृक्षांची लागवड करून वृक्षरोपण पंधरवडा साजरा करण्याची संकल्पना बार्टीचे महासंचालक धम्मज्योती गजभिये यांनी दिली आहे.

    पर्यावरण दिनानिमित्त कोरेगाव तालुक्यातील भीमनगर येथील स्मशानभूमी परिसरात ५० वृक्षांची लागवड करण्यात आली. प्राणवायूविना प्राण जाण्याच्या संकटाला आज जग सामोरे जात असताना प्राणवायूविना कोणाचाही प्राण जाऊ नये. या उदात्त हेतूने संपूर्ण महाराष्ट्रातील ३५० समतादूत यांच्या माध्यमातून लाखो वृक्षांचे रोपण करून निसर्ग संवर्धनाचा वसा आणि वारसा जोपासण्याच्या हेतूने समाजहिताचा हा उपक्रम राबवत आहेत.

    या कार्यक्रमास सरपंच सुरेश कांबळे, आरपीआय गवई गट पश्चिस महाराष्ट्राचे सचिव चंद्रकांत कांबळे, गुरुकुल करियर अकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष रफीक इनामदार,भिमनगर तरुण मित्रमंडळ, दीपक कदम, नितीन रोकडे, गुणाजी कांबळे, ग्रामपंचायत सदस्य अमोल ससाणे, अशोक कदम, जनार्दन कांबळे, मयूर ससाणे, सुरेश भिवा कांबळे, स्वप्निल कांबळे, समतादूत विशाल कांबळे आदींची उपस्थिती होती. जिल्ह्याचे प्रकल्प अधिकारी दिलीप वसावे यांचे सहकार्य लाभले.