महाराष्ट्र माथाडी कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी वाईचे भैय्यासाहेब डोंगरे

    वाई/नवराष्ट्र न्यूज नेटवर्क : वाई तालुका हा राजकीयदृष्ट्या जागृत व विकासात्मक दृष्टीकोनातून माजी खासदार स्वर्गीय लक्ष्मणराव पाटील यांच्या विचारांचा असल्याने सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याचे राजकीय अस्तित्व जिवंत राहिले आहे. त्यांच्या निधनानंतर वाई खंडाळा महाबळेश्वर तालुक्यातील जनतेने तात्यांची राजकीय विचारसरणी पुढे नेण्यासाठी आमदार रूपाने मकरंद पाटील यांना वाव दिला. त्यांनी माझ्या तालुक्यातील तरुण कार्यकर्त्यांना राज्य व जिल्हा पातळीवर महत्वाचे स्थान मिळावे यासाठी त्यांची सदैव धडपड असते. त्याचाच एक भाग म्हणून वाई पंचायत समितीचे उपसभापती भैय्यासाहेब डोंगरे यांची ऑल महाराष्ट्र राज्य माथाडी व जनरल कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.

    डोंगरे यांच्या निवडीसाठी राज्याध्यक्ष बाळासाहेब भोरकर यांच्याकडे आमदार मकरंद पाटील यांनी शिफारस केल्यामुळेच राज्याचे ग्रामविकासमंत्री व कामगारमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते मकरंद पाटील यांच्या उपस्थितीत भैय्यासाहेब डोंगरे यांना सातारा जिल्हाध्यक्षपदी निवड केल्याचे पत्र प्रदान करण्यात आले. या निवडीमुळे वाई तालुक्याला जिल्हाध्यक्षपदाचा मान मिळाल्याने वाई पंचायत समितीच्या सर्व पदाधिका-यांना याचा स्वाभिमान आहे, असे गौरवोद्गार वाई पंचायत समितीच्या सभापती संगीता चव्हाण यांनी वाई पंचायत समितीमध्ये भैय्यासाहेब डोंगरे यांच्या सत्कार समारंभप्रसंगी काढले.

    या सत्कार समारंभास पंचायत समिती सदस्य मधुकर भोसले, युवानेते सुधीर भोसले, पश्चिम भाग राष्ट्रवादी संघटक संजय कांबळे, युवा उद्योजक प्रशांत निकम, माजी सभापती रजनी भोसले, माजी उपसभापती अनिल जगताप, मोहन चव्हाण व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी यावेळी उपसभापती भैय्यासाहेब डोंगरे यांच्या माथाडी कामगार संघटनेच्या जिल्हाध्यक्षपदी निवड झाल्याबद्द्ल उपस्थितांनी शुभेच्छा दिल्या.