आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांचे पुन्हा भजन आंदोलन

    सातारा : कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश शिंदे यांच्या नेतृत्वाखाली वारकऱ्यांनी शुक्रवारी पुन्हा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. हभप बंडातात्या कराडकर यांच्या सुटकेसाठी पुन्हा भजन आंदोलन करून वारकऱ्यांनी पोलीस प्रशासनाचा निषेध केला.

    पंढरपूर येथील पायी वारीत सहभागी होण्‍यासाठी निघालेल्‍या ह.भ.प. बंडातात्‍या कराडकर यांची पोलिसांच्‍या स्‍थानबध्‍दतेतून सुटका करावी, यासाठी आज कोरेगावचे आमदार महेश शिंदे यांच्‍या उपस्‍थितीत जिल्‍हाधिकारी शेखरसिंग यांना बंडातात्या यांची सुटकेची मागणी करणारे निवेदन सादर करण्यात आलेे. बंडातात्‍यांची स्‍थानबध्‍दतेतून सुटका न केल्‍यास आगामी काळात वारकर्‍यांसह तीव्र आंदोलन करण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे.

    पायी वारीत सहभागी होण्‍यासाठी निघालेल्‍या बंडातात्‍या यांना पुणे पोलिसांनी ताब्‍यात घेतले होते. यानंतर त्‍यांना करवडी येथील गोपालन केंद्रात स्‍थानबध्‍द करण्‍यात आले. या गोपालन केंद्राला पोलिसांनी वेढा दिला असून आतमध्‍ये जाण्‍यास इतरांना मनाई करण्‍यात आली आहे. शासनाच्‍या या कृतीचा निषेध करण्‍याचे सत्र गेले दोन दिवस जिल्‍ह्याच्‍या विविध भागात सुरु आहे. शुक्रवारी शासनाच्‍या या कृतीचा निषेध करण्‍यासाठी कोरेगावचे आमदार महेश शिंदे, ह.भ.प. धनश्‍‍याम नांदगावकर यांच्‍या नेत्तृत्‍वाखाली आंदोलनाचा इशारा दिला होता. या इशार्‍याच्‍या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सातार्‍यात येणाऱ्या मार्गावर चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता.

    कर्‍हाड येथून येणार्‍या वारकर्‍यांना तेथेच पोलिसांनी स्‍थानबध्‍द केल्‍याचे समजल्‍यानंतर वारकरी महासंघाच्या सदस्यांसह दुपारी बाराच्‍या सुमारास महेश शिंदे हे वारकर्‍यांसमवेत जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर हजर झाले. याठिकाणी भजन आंदोलनाच्‍या माध्‍यमातून शासनाचा निषेध करण्‍यात आला. आंदोलन सुरु असतानाच बंडातात्‍या कराडकर यांची स्‍थानबध्‍दतेतून सुटका करावी, अशी मागणी करणारे निवेदन आमदार शिंदे, धनश्‍‍याममहाराज नांदगावकर व इतरांनी जिल्‍हाधिकारी शेखर सिंह यांना दिले. या निवेदनात मागणी मान्‍य न केल्‍यास आगामी काळात वारकर्‍यांसह तीव्र आंदोलन छेडण्‍याचा इशारा देण्‍यात आला आहे. या आंदोलनाच्‍या पाश्र्वभूमीवर जिल्‍हाधिकारी कार्यालयासमोर मोठा पोलिस बंदोबस्‍त तैनात करण्‍यात आला होता.