जावली सहकारी बँकेच्या उपाध्यक्षपदी भानुदास जाधव

    मेढा : जावळी तालुक्याची मुख्य अर्थवाहिनी असलेल्या व १३०० कोटींची आर्थिक उलाढाल असलेल्या जावली सहकारी बॅंकेच्या उपाध्यक्षपदी भानुदास जाधव यांची काल बिनविरोध निवड करण्यात आली. मुंबई येथील बॅंकेच्या गोल देऊळ येथील मुख्य कार्यालयात पदाधिकारी निवडीसाठी आज संचालक मंडळाची बैठक झाली. यावेळी उपाध्यक्षपदाची निवड करण्यात आली.

    ज्येष्ठ संचालक हणमंत गणपत पवार यांनी आपल्या उपाध्यक्षपदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या या जागेवर भानुदास जाधव यांची वर्णी लागली. भानुदास जाधव हे अभयलक्ष्मी पतसंस्थेचे संस्थापक असून, त्यांना सहकाराचा गाढा अनुभव आहे. त्यामुळे त्यांच्या या अनुभवाचा फायदा बँकेला व्हावा, यासाठी सर्व संचालकांनी त्यांचेकडे उपाध्यक्षपदाची धुरा दिली आहे.

    निवडीनंतर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व बॅंकेचे मार्गदर्शक वसंतराव मानकुमरे यांच्या हस्ते नूतन उपाध्यक्षांचा सत्कार करण्यात आला. नवनिर्वाचित उपाध्यक्ष भानुदास जाधव यांनी यावेळी सर्व संचालकांचे आभार मानून अध्यक्ष राजाराम ओंबळे व इतर सहकारी संचालकांनासोबत घेऊन आपल्याला मिळालेल्या अल्पशा संधीचा पुरेपूर उपयोग करून बँकेच्या भरभराटीसाठी आपण प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.

    भानुदास जाधव हे सहकार क्षेत्रातील अनुभवी नेतृत्व असल्याने आगामी काळात ते बॅंकेच्या हितासाठी प्रयत्न करून बॅंकेला प्रगतिपथावर नेतील, असा विश्वास वसंतराव मानकुमरे यांनी व्यक्त केला. यावेळी बॅंकेचे माजी अध्यक्ष राजाराम ओंबळे, विक्रम भिलारे, आनंदराव सपकाळ, हणमंत पवार यांच्यासह सर्व संचालक, अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. निवडीनंतर आमदार शशिकांत शिंदे, आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले व आमदार मकरंद पाटील आदींसह अनेक मान्यवरांनी जाधव याना शुभेच्छा दिल्या.