‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकलेंचे पुन्हा नवं वक्तव्य; वारीबाबत म्हणाले…

    सातारा : आपण वारकऱ्यांच्या पाठीशी असून, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आषाढी एकादशीला पंढरपूरला पांडूरंगाच्या पूजेला जाणार असतील तर मी देखील त्या दिवशी पंढरपूरला जाणारच असा निर्धार ‘बिग बॉस’ फेम अभिजित बिचुकले यांनी व्यक्त केला. एका कारखान्याच्या निवडणुकीला गर्दी जमली तरी चालते मग तेव्हा कोरोना नाही का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी राज्य सरकारवर सडकून टीका केली.

    आषाढी निमित्त बंडातात्या कराडकर आणि वारकऱ्यांना वारीच्या रस्त्यावर पायी चालत जात असताना पोलिसांनी ताब्यात घेतल्याने वारकऱ्यांमधून संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा बिगबॉस फेम अभिजित बिचुकले यांनी निषेध केला आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, ‘निवडणुका होतात तिथं लोक गर्दी करतात सातारा जिल्ह्यात एका कारखान्याची निवडणूक झाली. तिथं कोणावरही गर्दी केली म्हणून गुन्हा दाखल झाला नाही. मग पांडूरंगाच्या वारीसाठी आडकाठी का?’असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

    बिचुकले म्हणाले, “उद्धवजी पंढरपूरला येणार असतील तर मीही एक भाविक म्हणून तिथे आषाढी एकादशीला अवश्य जाणार आहे. कळसाचं दर्शन झालं तरी चालेल पण आषाढी एकादशीला मी पंढरपूरला जाणार म्हणजे जाणारच. आषाढीची वारी ही शेकडो वर्षांची परंपरा आहे पांडुरंग हा सर्वसमावेशक असल्यामुळे मी आषाढी एकादशीला आवश्य दर्शनासाठी एक वारकरी म्हणून जाणार आहे. मुख्यमंत्री जाऊ शकत असतील तर मला आडकाठी असण्याचं कारण नाही. कायदा सर्वांना समान आहे. त्यामुळे शेकडो वर्शांची परंपरा असलेली वारी कोणी थांबवू शकत नाही. आता मी सहन करणार नाही.”

    गेल्या वर्षी लोकांनी सणवार साजरे केले नाहीत. शासनाच्या निर्बंधांचे पुरेपूर पालन केले. मात्र, सातारा जिल्ह्यात एका आठवड्यात निर्णय बदलून अनलॉक असताना सातारा जिल्हा पुन्हा लॉक करण्यात आला. शासनानं गुढीपाडवा करू दिला नाही. आंबेडकर जयंती करू दिली नाही, ईदही साजरी करू दिली नाही. परवा बंडातात्यांना उचलून नेले. सरकार लोकांना का आडवतयं काही कळत नाही, अशी टीकाही त्यांनी राज्य सरकारवर केली.