भाजप लढवणार सातारा जिल्हा बँकेची निवडणूक; डॉ. अतुल भोसले यांचे संकेत

  कराड : भाजपची सहकार क्षेत्रात ताकद वाढली आहे. त्यामुळे सातारा जिल्हा बँक निवडणुकीसंदर्भात आमचे नेते देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (दादा) यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल. भाजपाला विश्वासात घेतल्याशिवाय कुणालाही आपले समीकरण बांधता येणार नसल्याचे डॉ. अतुल भोसले यांनी स्पष्ट केले.
  दरम्यान, जिल्ह्याची शिखर बॅंक असल्याने या संस्थेचे राजकारण करताना आमचा विचार घेतल्याशिवाय कुणालाही निर्णय घेता येणार नसल्याचा दावा भाजपाचे नेते डाॅ. भोसले यांनी केला आहे.

  कराड येथे भाजपा प्रदेश कार्यकारिणीचे सदस्य डॉ. अतुल भोसले यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी व सामान्य नागरिकांच्या प्रश्नांबाबत, शेतकऱ्यांचा मुक मोर्चा काढण्यात आला यावेळी ते बोलत होते. यावेळी कृष्णा सरकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, धनाजी पाटील, उमेश शिंदे, संचालक सयाजी यादव, मकुंद चरेगांवकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

  राष्ट्रवादी काँग्रेसचे वर्चस्व असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी भाजपाचीही तयारी सुरू असल्याचे आज स्पष्ट झाले. जिल्हा बॅंकेच्या निवडणुकीत भाजपाची भूमिका काय राहणार यावर भाजपाचे डाॅ. अतुल भोसले यांनी सुतोवाच करत होऊ घातलेली जिल्हा बँकेची निवडणूक काँग्रेस व राष्ट्रवादीला सोपी नसल्याचे संकेत दिले.

  ते म्हणाले, राज्यासह देशातील सहकार क्षेत्रात भारतीय जनता पार्टीची ताकद वाढली आहे. सातारा जिल्हा मध्यवर्ती बँक जिल्ह्याची शिखर बँक आहे. आणि या बँकेच्या निवडणुकीत कोणालाच आपलं समीकरण करता येणार नाही. यासाठी भाजपाला विश्वासात घ्यावे लागेल.

  भाजप निवडणुकीला सामोरे जाणार

  सातारा जिल्हा बँक निवडणुकीच्या अनुषंगाने भाजप संपूर्ण तयारीने निवडणुकीला सामोरे जाण्याची मानसिकतेत दिसत आहे. या प्रक्रियेत खासदार उदयनराजे भोसले, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. जयकुमार गोरे, डाॅ. अतुल भोसले, माजी आमदार व माथाडी कामगार नेते नरेंद्र पाटील, सहकार परिषदेचे माजी अध्यक्ष शेखर चरेगावकर, जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर यांची भूमिका निर्णायक राहणार आहे.