ब्रिटिशकालीन पिंगळी तलाव मोजतोय अखेरच्या घटका

  म्हसवड : माण तालुक्यातील दहिवडी, पिंगळी, गोंदवले व वाघमोडेवाडी या गावांसाठी वरदान ठरलेल्या पिंगळी (ता.माण) येथील ब्रिटिशकालीन तलावाचे अस्तित्व धोक्यात आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. तालुक्यातील मुख्य ठिकाणीच पाटबंधारे विभागाचे दुर्लक्ष होत असल्याने अनेक गावांसाठी ही धोक्याची घंटा असल्याचे बोलले जात आहे.

  तलावाच्या भराव्यावर काटेरी झाडे झुडपे यांची झालेली मोठ्या प्रमाणात वाढ, तलावातील पाण्याची भराव्या खालून होणारी गळती, संरक्षक कठड्यावर वाढलेली झाडे, विनापरवाना घेण्यात आलेल्या तलावातील विहिरी शेजारीच असलेल्या मेष पालन केंद्राचे वाढते अतिक्रमण व त्यांनी काढलेली बोरवेल, तलावाच्या देण्यात आलेल्या भाडे पट्टा करार जागा व अनधिकृत बांधकामे यामुळे तलावाचे अस्तित्वच धोक्यात आल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.

  ब्रिटिशकालीन तलावाची ही बदलती भयावह परिस्थिती लक्षात घेता आगामी काही काळातच दहिवडी, पिंगळी, गोंदवले व वाघमोडेवाडी या गावांना शेतीच्या व पिण्याच्या पाण्याच्या समस्येचा फार मोठा सामना करावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच पिंगळी पोट कालवे देखील अनेक ठिकाणी बुजवण्यात आले आहे याकडे पाट करी कर्मचारी यांचे दुर्लक्ष असल्याने हे बुजवण्यात आले आहेत तर अनेक ठिकाणी सांड पाणी सोडण्यासाठी दहिवडी नगरपंचायत याचा वापर करत असल्याचे दिसत आहे. हे तात्काळ कारवाई करून पुन्हा एकदा या तलावाला व पोट कालव्याला जीवदान मिळावे असे नागरिक अपेक्षा करत आहेत.

  दहिवडी, पिंगळी, गोंदवले व वाघमोडेवाडी या गावांसाठी तारणहार ठरलेल्या पिंगळी तलावाची झालेली दुर्दशा स्थानिक प्रशासन म्हणून तहसीलदार तसेच प्रांताधिकारी यांनी स्वतः लक्ष देऊन अधिकारी व कर्मचारी यांची कानउघडणी करावी.

  – राजू मुळीक, अध्यक्ष, माण-खटाव ग्राहक प्रबोधन समिती

  पाटबंधारे विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांनी तात्काळ दखल घेऊन तलावातील झाडे झुडपे तसेच पोट केनॉल यांची सफाई करून गळती काढण्यासाठी प्रयत्न करावेत. अन्यथा आंदोलन मार्ग हाती घ्यावा लागेल.

  – सुरेंद्र मोरे, नगरसेवक, दहिवडी नगरपंचायत