सोळशी डोंगरावरील वनसंपदा जळून खाक ; पशुपक्षांची घरटी, अंडी, सरपटणारे जीव व जनावरांचा चारा जळाला

    वाई : वाई तालुक्याच्या पुर्व भागातील वेळे, सोळशी, भिलारवाडी आणि मोहडेकरवाडी येथील सह्याद्रीच्या डोंगररांगांना लागलेल्या आगीत डोंगरातील पशुपक्षांची घरटी, अंडी, सरपटणारे जीव व जनावरांचा चारा आणि वनसंपदा जळून नष्ट झाली. सकाळी दहाच्या सुमारास सोळशी गावाच्या डोंगरावर ही घटना घडली. वार्‍याच्या प्रवाहाने अंदाजे २० किमी अंतर तोडत हा वनवा मोहडेकरवाडीच्या डोंगरापर्यंत पोहचल्याची माहिती वाईचे वनअधिकारी महेश झांजुर्णे यांना मोहडेकरवाडीचे पोलीस पाटील विकास बांदल यांनी सांगितली. झांजुर्णे यांनी तातडीने भुईंज येथील पाच वनकर्मचार्‍यांचे पथक हा वनवा विझविण्यासाठी पाठविले.

    बारा तास कर्मचारी, ग्रामस्थांची झुंज
    वनपाल संग्राम मोरे, संजय आडे, वनरक्षक लक्ष्मण देशमुख, अजित इथापे, मोहडेकरवाडीचे पोलीस पाटील, शिवाजी बांदल, निलेश बांदल, तुषार बांदल, अजित बांदल, संदीप जगताप या सर्वांनी एकत्रित येवून भर उन्हाच्या तडाख्यात सकाळपासून झुडपांच्या फांद्यांच्या सहाय्याने वनवा आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा केली. तब्बल १२ तास वनविभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ वनव्याशी झुंज देत होते. वेळे, भिलारवाडी व मोहडेकरवाडी या गावांमध्ये वनविभागाने अचानक लागलेला वनवा विझविण्यासाठी समित्या तयार केल्या होत्या. परंतू दुर्दैवाने या गावातील गावकारभार्‍यांसह समितीच्या सदस्यांना वनवा लागल्याची माहिती देण्यात येऊनही कोणी पुढे न आले नाही. अागीत अनेक पक्षांची घरटी, अंडी, पिल्ले जळून खाक झाली.

    दुर्मिळ औषधी वनस्पती भक्ष्यस्थांनी
    सह्याद्रीच्या डोंगर रांगांमध्ये वर्षेपरंपरेने अनेक दुर्मिळ औषधी वनस्पती विपुल प्रमाणात सापडत होती. मात्र वनव्याने या वनस्पती जळून खाक झाल्या असून डोंगर बोडके झाले आहेत. गावातील वनवा विझविणार्‍या समित्या व गाव पुढार्‍यांना आपल्या जबाबदारीचे भान नसल्याने ते वनव्याकडे फिरकलेच नाहीत. मात्र वनविभागाचे प्रमुख असलेले महेश झांजुर्णे यांनी गंभीर दखल घेवून वनविभागापासून समितीस मिळणारे फायदे या तीन्ही गावातील सदस्यांना देऊ नयेत, अशी मागणी केली अाहे.