वाईमध्ये बंगल्यातच सुरु होती गांजाची शेती; २९ किलो गांजा जप्त

जिल्ह्यातील वाई शहरातील उच्चभ्रू कॉलनीमध्ये एका बंगल्यात गांजाची शेती सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन जर्मन तरुण ही शेती करत होते. विशेष म्हणजे आधुनिक तंत्राचा वापर करुन ही शेती केली जात होती. या दोघा तरुणांना अटक करण्यात आली. गांजा शेतीचा प्रकार उघडकीस आल्यानं वाईमध्ये खळबळ उडाली आहे.

    सातारा : जिल्ह्यातील वाई शहरातील उच्चभ्रू कॉलनीमध्ये एका बंगल्यात गांजाची शेती सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. दोन जर्मन तरुण ही शेती करत होते. विशेष म्हणजे आधुनिक तंत्राचा वापर करुन ही शेती केली जात होती. या दोघा तरुणांना अटक करण्यात आली. गांजा शेतीचा प्रकार उघडकीस आल्यानं वाईमध्ये खळबळ उडाली आहे.

    या कारवाईत २९ किलो गांजा जप्त केला आहे. जप्त केलेल्या गांजाची किंमत आठ लाख २१ हजार रुपये इतकी आहे. सातारा जिल्हा विशेष शाखेला वाई शहरात दोन परदेशी नागरीक अनधिकृतरीत्या राहत असल्याची माहिती मिळाली होती.

    याप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांनी त्यांच्याकडे पारपत्र व व्हिसा याबाबत चौकशी करण्यासाठी सोमवारी रात्री वाई येथील नंदनवन पार्क या सोसायटीतील बंगल्यावर छापा टाकला यावेळी हा प्रकार उघडकीस आला. त्यांच्याकडे परदेशी नागरिकत्वाचा पुरावा व वीस आढळून आला नाही .

    घराची पाहणी करत असताना त्यांच्या घरात गांजा सदृश्य वनस्पती दिसून आल्या. गांजाची लागवड करण्यासाठी घरामध्ये व गच्चीवर ग्रीन हाऊस उभारण्यात आले होते. गांजाची लागवड वाढ करण्यासाठी त्यांनी अद्यावत पद्धत विकसित केली होती.