फरार आरोपीबाबत माहिती देणाऱ्यास महाबळेश्वर पोलिसांकडून रोख बक्षिस

    महाबळेश्वर :  एक सप्टेंबरच्या सकाळी शौचालयावरून परत घरी येत असलेल्या आपल्या पत्नीला पेट्रोल टाकून जाळून मारणारा आरोपी राजू घोडेवाला उर्फ राजेंद्र महादेव जाधव (वय 55 रा. व्हॅली व्ह्यू रोड वरील चाळ महाबळेश्वर) हा आरोपी गेल्या पंधरा दिवसांपासून फरार आहे. या आरोपीची माहिती देणाऱ्यास महाबळेश्वर पोलिसांनी रोख बक्षीस जाहीर केले आहे.

    माणुसकीला काळीमा फासणाऱ्या एका घटनेने महाबळेश्वर हादरले होते. सकाळी शौचालयावरून घरी परत येत असलेल्या आपल्या पत्नीच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला पेटवुन देणारा नराधम पती राजेंद्र महादेव जाधव उर्फ राजु घोडेवाला हा घटना स्थळावरून फरार झाला होता. या आरोपीच्या शोधासाठी महाबळेश्वर पोलिसांनी तीन पथके वेगवेगळया दिशेने रवाना केली होती. ही तीनही पथके हात हलवित परत आली. या तीनही पथकाला हा अरोपी सापडला नाही.

    गेली पंधरा दिवस महाबळेश्वर पोलिस या फरार आरोपीचा शोध घेत आहेत. एकदा काही नागरिकांनी दारूच्या गुत्त्यावर या आरोपीस पाहिले होते. परंतु त्या दिवशीही पोलिसांच्या हाती हा आरोपी लागला नाही. शहर परीसरातील जंगलात हा आरोपी लपला असल्याची खात्री महाबळेश्वर पोलिसांना आहे. या आरोपीचा शोध घेण्यासाठी नागरीकांच्या मदत घेण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला आहे. म्हणून नागरिकांना या आरोपीची माहिती देण्याचे पोलिसांनी सोशल मीडियावर आवाहन केले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवले जाणार असून माहिती देणाऱ्यास पोलिस विभागाकडून रोख बक्षिसही दिले जाणार असल्याचे पोलिसांनी जाहीर केले आहे.

    पत्नीला पेटवून दिल्यानंतर चाळीतील स्थानिक नागरकांनी आग आटोक्यात आणून महिलेला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. या महिलेवर मुंबई येथील कस्तुरबा गांधी या रूग्णालयात उपचार सुरू होते. परंतु आठ सप्टेंबर रोजी या महिलेचे निधन झाले. प्रारंभी महाबळेश्वर पोलिसांनी आरोपीवर गुन्हा दाखल केला होता. मात्र, जखमी महिलेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. महाबळेश्वर पोलिसांनी केलेल्या आवाहनास महाबळेश्वर येथील नागरिक नक्कीच प्रतिसाद देतील, असा विश्वास महाबळेश्वर पोलिसांनी व्यक्त केला आहे.