आषाढी वारी व बकरी ईद साधेपणाने साजरी करा : संजय बोंबले

    पुसेगाव : आषाढी वारी व बकरी ईद साधेपणाने घरीच साजरी करा. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचना समजावून सांगून कोणीही सार्वजनिक ठिकाणी नमाज पठण करू नये. यावर्षी जास्तीत जास्त प्रतिकात्मक स्वरूपात कुर्बानीचा कार्यक्रम करून उत्सव शांततेत व आनंदात साधेपणात साजरा करावा, असे आवाहन पुसेगाव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय बोंबले यांनी केले आहे.

    आषाढी वारी व बकरी ईद या धार्मिक उत्सवाच्या निमित्ताने पुसेगाव पोलीस स्टेशनमध्ये पोलीस पाटील व खटाव येथे मुस्लिम बांधवांची मिटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन व जिल्हाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचना समजावून सांगण्यात आल्या. गावात होणाऱ्या वाढत्या चोरीच्या अनुषंगाने ग्रामसुरक्षा दलातील कार्यकर्ते यांना सतर्क राहण्याबाबत सूचना दिल्या. 19 जुलैच्या आषाढी वारीच्या अनुषंगाने शासनाने पालखी सोहळ्यासाठी 40 वारकऱ्यांना एसटीने जाण्यास परवानगी दिली असून, कोणीही वारीला पंढरपूर येथे जाऊ नये व आगामी बकरी ईद अनुषंगाने नमाज सार्वजनिक ठिकाणी अदा न करता घरीच अदा करण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या.

    ग्रामीण भागात कोरोनाचा संसर्ग वाढत चाललेला असून, गावात रुग्ण सापडल्यास त्यांना समितीच्या वतीने तात्काळ विलगीकरण कक्षात दाखल करावे व हायरिस्क लोकांची यादी करून त्यांची कोरोना टेस्ट करून घ्यावी. वेळेतच दुकान, हॉटेल चालू ठेवण्यास सांगावे. जो कोणी या नियमांचे उल्लंघन करील, त्यांच्यावर कोरोना ग्रामसमिती मार्फत योग्य ती कायदेशीर कारवाई करावी. अन्यथा पोलीस स्टेशनला याची माहिती द्यावी, असे आवाहन पुसेगांव पोलीस स्टेशनचे एपीआय संजय बोंबले यांनी केले आहे. या कार्यक्रमात पुसेगाव पोलीस स्टेशनच्या कार्यक्षेत्रातील सर्व गावांचे पोलीस पाटील हजर होते.