एसटी आगारात वाढदिवस साजरा करणे कर्मचाऱ्याला पडले महागात; आगारप्रमुखासह ११ जणांवर गुन्हा

    वडूज : सातारा जिल्ह्यातील वडूज एसटी आगारात एका सहकारी कर्मचाऱ्याचा वाढदिवस साजरा करून आपत्ती व्यवस्थापन कायद्याचा भंग केल्याप्रकरणी आगारप्रमुखासह ११ जणांवर वडूज पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आपत्ती व्यवस्थापन कायद्याच्या चौकटीत अधिकऱ्यांविरोधात असा गुन्हा दाखल होण्याची ही पहिलाच वेळ असल्याचे सांगितले जात आहे.

    याबाबत माहिती अशी की, सध्या लॉकडाउन व कॊरोना संसर्गामुळे लोकांनी अनावश्यक घराबाहेर पडू नये. अशी वारंवार सूचना दिली जाते. तरीही काही महाभाग हे आज ही वडूज परिसरात मोकाट फिरत असतात. अशा लोकांवर निर्बन्ध घालण्यासाठी पोलीस व महसूल विभागाने आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून वडुजला एस टी आगारात सायंकाळी सात वाजता वाढदिवस साजरा होत असल्याची माहिती वडूज पोलिसांना मिळाली. त्यानंतर घटनास्थळी पोलीस पथक गेले असता वाढदिवस साजरा करणाऱ्या आगार प्रमुखांच्यासह अकरा जणांवर वडूज सार्वजनिक उपद्रव करणे यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    या गुन्ह्यामध्ये विजय लावंड, संजय अवघडे, अमरसिंह फडतरे, नंदकुमार मोहिते, नानासाहेब भोसले, गणेश गोडसे, सचिन गुरव, अजित पिसाळ,गणेश शिंदे, प्रवीण कचरे, व कुलदिप डुबल यांच्याविरोधात भा द विधान कलम १८८/२६९ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    विशेष म्हणजे वाढदिवस साजरा करताना कोणीही मास्क लावले नव्हते. याबाबतची फिर्याद पोलीस कर्मचारी आण्णाराव मारेकर यांनी दिली असून पोलीस हवालदार राहुल सरतापे अधिक तपास करीत आहेत.