महाराष्ट्र पोलीस नागरिकांच्या हिताचे संरक्षणकर्ते : मुख्यमंत्री ठाकरे

    सातारा : महाराष्ट्र पोलीस हे नागरिकांच्या हिताचे, मालमत्तेचे रक्षण करतात. तसेच कोरोना प्रादुर्भावाच्या संकटात पोलिस हे रस्त्यावर उतरून शासनाने घातलेल्या निर्बंधाचे पालन नागरिकांकडून करुन घेतात. पोलिसांचा ताण कमी करण्यासाठी त्यांना भौतिक सुविधा देण्यावर शासनाचा भर असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

    पाटण तालुक्यातील मल्हारपेठ येथील पोलीस ठाणे व वसाहतीचे ई-भूमीपुजन आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. या ई-भूमीपुजन समारंभास उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई, गृह राज्यमंत्री सतेज पाटील (शहरे), पोलीस महासंचालक संजय पांडे, पोलीस महासंचालक तथा पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विवेक फणसळकर, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोज लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अपर पोलीस अधीक्षक धीरज पाटील आदी उपस्थित होते.

    पोलिसांचा प्रवासाचा वेळ वाचण्यासाठी पोलिस ठाण्याच्या जवळच पोलीस कर्मचाऱ्यांची घरे असणे खूप महत्वाचे आहे, असे सांगून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुढे म्हणाले, पोलीसांसाठी विभागवार प्रशिक्षण केंद्र असले पाहिजे. अशा प्रशिक्षण केंद्रांमुळे पोलीसांचे शारीरिक क्षमता व मनोबल वाढण्यास चांगली मदत होते. अशा प्रशिक्षणामुळेच आज महाराष्ट्र पोलीस देशात सर्वोत्तम आहे ती जगात सर्वोत्तम होईल, असा विश्वास व्यक्त केला.

    कोयनानगर येथे प्रशिक्षण केंद्र उभारण्याची मागणी होत आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या उभारणीचे सादरीकरण करण्यात यावे.
    कोरोनाचा मुकाबला करताना अनेक पोलीसांचे मृत्यु झाले, बरेच बाधित झाले. जे बाधित होऊन बरे झाले त्यांनी तात्काळ हजर होऊन आपले कर्तव्य बजावले. पोलीस विभागाला दिलासा व मनोर्धय वाढविण्याचे राज्य शासन काम करीत आहे. पोलीस विभाग अहोरात्र काम करीत आहे. शासन आपल्या पाठीशी खंबरीपणे उभे असल्याचेही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

    पोलिस गृहनिर्माण मंडळाचे राज्यात चांगले काम

    उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, मल्हारपेठ हे बाजारपेठेचे महत्वाचे गाव आहे. येथील लोकसंख्याही वाढली आहे. या ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही यासाठी राज्य शासनाने इथे पोलीस ठाणे वसाहत निर्माण करण्याचा निर्णय घेतला आहे. पोलीस ठाण्याबरोबरच वसाहतीचेही काम वेळेत आणि दर्जेदार करा. पोलीस गृहनिर्माण महामंडळाचे राज्यात चांगले काम सुरु आहे. त्यात सातत्य ठेवा. कोरोना संकटाच्या काळात कर्तव्य बजावत असताना कोरोनामुळे मृत्यु व बाधीत झालेल्या पोलिसांसाठी ५० लाखांचे संरक्षण तसेच ५५ वर्षांवरील पोलीस कर्मचाऱ्यांना फिल्डवर्क न देता कार्यालयातील काम देण्याचा चांगला निर्णय घेतला. पोलीस मित्र म्हणून समाजात काम करीत आहे. चांगल्या सुविधा देण्याचा शासनाचा भर आहे. कोरोना संकट काळात सातारा पोलीस दलाने रस्त्यावर उतरुन उत्कृष्ट असे काम केले. सातारा पोलीस दलाचे अभिनंदन करुन मल्हारपेठतील पोलीस ठाणे व वसाहतीला निधी कमी पडू दिला जाणार नाही, असे त्यांनी दिले.