चक्क पाण्याच्या टाकीवर  दोन नगरसेवकांचा ‘शोले’

सदर बझारला पाणी मिळत नसल्याने आंदोलन

    सातारा : जीवन प्राधिकरणला वारंवार कल्पना देऊनही सदर बझार परिसरातील पाणी पुरवठ्याचा प्रश्न मार्गी न लागल्याने बुधवारी सकाळी सातारा पालिकेच्या दोन नगरसेवकांनी पाण्याच्या टाकीवर चढून चक्क शोले स्टाईल आंदोलन केले. या आंदोलनाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली.

    सदर बझार परिसराला जीवन प्राधिकरणकडून पाणीपुरवठा केला जातो. उन्हाचा तडाखा वाढत असताना या भागाला सातत्याने कमी दाबाने पाणी मिळत आहे. त्यामुळे नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. नगरसेवक विशाल जाधव व मिलिंद काकडे यांनी पाणीप्रश्न मार्गी लावण्याबाबत जीवन प्राधिकरणकडे अनेकदा तक्रारी केल्या. वारंवार सांगूनही तक्रारींचे निरसन होत नसल्याचे पाहून दोन्ही नगरसेवकांनी बुधवारी सकाळी सदर बझार येथील पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन केले. पाण्याची टाकी संपूर्ण भरेपर्यंत दोन्ही नगरसेवक टाकीवरच बसून राहिले.

    सदर बझार परिसराची लोकसंख्या अधिक आहे. गेल्या काही दिवसांपासून येथील नागरिकांना भीषण पाणी टंचाई जाणवू लागली आहे नागरिकांना सातत्याने कमी दाबाने पाणी मिळत आहे. जीवन प्राधिकरणने याबाबत तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन केले जाईल, असा इशारा नगरसेवक विशाल जाधव व मिलिंद काकडे यांनी दिला.