साताऱ्यात आमदार व खासदार गटाच्या समर्थकांमध्ये राडा; नगरसेवक खंदारे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा

गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेले असताना सातारा शहरात बुधवारी रात्री पावणेनऊच्या दरम्यान आमदार व खासदार गटाच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला.

    सातारा : गणरायाचे आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेले असताना सातारा शहरात बुधवारी रात्री पावणेनऊच्या दरम्यान आमदार व खासदार गटाच्या समर्थकांमध्ये जोरदार राडा झाला. यामध्ये सशस्त्र मारामारी झाल्याने काही जखमी झाले असून, या प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी नगरसेवक बाळासाहेब खंदारे यांच्यासह आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकारामुळे रात्री शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने पोलीस बंदोबस्त वाढविण्यात आला.

    या प्रकरणी नगरसेवक बाळू खंदारेसह त्याच्या साथीदारांविरुद्ध दरोडा, खुनाचा प्रयत्नसह विविध कलमान्वये सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या राड्यात ५ जण जखमी झाले आहेत. त्यांच्यावर उपचार सुरू आहे. दरम्यान, या सर्व घटनेनंतर परिसरासह खासगी हॉस्पिटल बाहेर समर्थकांची गर्दी वाढली होती.

    बाळू खंदारे, आकाश नेटके, शुभम भिसे, शैलेश बडेकर, निखिल किर्तीकर यांच्यासह इतर अनोळखी ८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी सनी मुरलीधर भोसले (सर्व रा. सातारा) यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

    संशयितांनी गुप्ती, रॉड, कोयता याचा हल्ल्यासाठी वापर केला. पिस्टलचा धाक दाखवल्याचे तक्रारीत म्हटले आहे. हा सर्व राडा राजपथावरील पोलीस करमणूक केंद्राच्या गेट परिसरात झाला. गाडी लावण्याच्या कारणावरून झालेल्या वादावादीचे पर्यावसान भांडणात झाल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.