कस्तुरबा रूग्णालयातील ‘त्या’ डॉक्टरच्या विरोधात तक्रार ; मनमानी कारभारामुळे वैतागलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे निवेदन

कस्तुरबा रुग्णालयात दादागिरी केल्या प्रकरणी नगरसेविका स्मिता घोडके व त्यांचे पती चंद्रशेखर घोडके यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . या प्रकरणाची खासदार उदयनराजे भोसले यांनी दखल घेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना कस्तुरबा प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या .

    सातारा : सातारा पालिकेच्या कस्तुरबा रूग्णालयात लसीकरण प्रक्रियेत दादागिरी केल्याच्या आरोपावरून नगरसेविकेसह तिच्या पतीवर गुन्हा दाखल झाल्याचे प्रकरण ताजे असताना याच रूग्णालयातील एका डॉक्टराच्या मनमानी हस्तक्षेपाला वैतागलेल्या आरोग्य सेवकांनी शाहूपुरी पोलीस स्टेशनला लेखी निवेदन दिले आहे .
    येथील कस्तुरबा रूग्णालयात जिल्हा परिषदेच्या वतीने जी आरोग्य यंत्रणा नियुक्त आहे त्यामध्ये एक खाजगी डॉक्टर दीपक थोरात यांना येथे दोन तासाची सेवा बजाविण्याचे निर्देशित करण्यात आले आहे . डॉ थोरात यांच्या कार्यपध्दतीवर आरोग्य कर्मचाऱ्यांची तीव्र नाराजी आहे . आरोग्य केंद्रावर आपल्या ओपीडीच्या कर्मचाऱ्यांना पाचारण करणे, ओळखीचे नागरिक किंवा हितचिंतकांचे जबरदस्तीने लसीकरण करविणे, काहींची नावे जबरदस्तीने टोकनच्या यादीत घुसविणे इं कार्यपध्दतीवर आरोग्य सेवकांनी आक्षेप घेतले आहेत . आरोग्य सेवकांच्या या तक्रारीचे पत्रही दाबण्याचा प्रयत्न करण्यात आला . आरोग्य कर्मचाऱ्यांनीही तक्रारीच्या भानगडीत न पडता लसीकरण कार्यक्रमाला प्राधान्य दिले होते . मात्र विनाकारण हस्तक्षेपाचा कडेलोट झाल्याने डॉ थोरात यांच्या मनमानी कारभाराचा भांडाफोड करणारे तक्रारीचे पत्र थेट शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्या टेबलावर पोहचले आहे . या डॉक्टराची तक्रार झाल्याने पोलीस काय कारवाई करणार याकडे सातारकरांचे लक्ष लागून राहिले आहे .
    नगरसेविका गुन्हा प्रकरणाची उदयनराजे यांच्याकडून दखल
    कस्तुरबा रुग्णालयात दादागिरी केल्या प्रकरणी नगरसेविका स्मिता घोडके व त्यांचे पती चंद्रशेखर घोडके यांच्यावर शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला . या प्रकरणाची खासदार उदयनराजे भोसले यांनी दखल घेत मुख्याधिकारी अभिजीत बापट यांना कस्तुरबा प्रकरणात लक्ष घालण्याच्या सूचना दिल्या . उदयनराजे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांच्याशी संपर्क साधून वस्तुस्थिती पूर्ण तपास करून मग कारवाई करा अशी विनंती केल्याची माहिती आहे .
    आपण लसीकरण केंद्रावर दादागिरी केलीच नाही . आम्ही रितसर नोंदणी करूनच लसीकरणाला गेलो होतो . तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आम्हाला दुपारनंतरची वेळ दिली . टोकन घेतलेल्या नागरिकांच्यानंतरच आम्ही लस घेतली . आम्ही जवाबदार नागरिक आहोत , आमची कर्तव्ये आम्हाला ठाऊक आहेत, पोलिसांनी गैरसमजातून आम्हाला न विचारता गुन्हा दाखल केल्याचा खुलासा सातारा विकास आघाडीच्या सभागृह नेत्या स्मिता घोडके यांनी केला .