प्राथमिक शिक्षक बॅंकेच्या ऑनलाईन सभेत संचालकांचा गोंधळ

    सातारा : शिक्षक बँकेच्या ऑनलाईन सर्वसाधारण सभेत शिक्षक समितीचे संचालक किरण यादव यांनी सभासदांचे माईक बंद केल्याचा आरोप करत गोंधळ घातला. चेअरमन राजेंद्र घोरपडे, व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे यांनी सभासदांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. चेअरमन घोरपडे यांनी बँकेला 2 कोटीचा फायदा झाल्याचे सांगितले. सत्ताधारी संचालकांनी ठराव मांडले. त्यास अनुमोदन देत विषय मंजूर करण्यात आले. तर काही सभासदांनी विषयांना विरोध केला.

    शिक्षक बँकेची 74 वी वार्षिक सर्वसाधारण सभा ऑनलाईन पद्धतीने चेअरमन राजेंद्र घोरपडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. या सभेला व्हाईस चेअरमन महेंद्र अवघडे, संचालक दत्तात्रय कोरडे, ज्ञानेश्वर कांबळे, राजेंद्र जाधव, निर्मला बसागडे, मोहन निकम यांच्यासह सर्व संचालक उपस्थित होते.

    चेअरमन घोरपडे म्हणाले, कोरोनाच्या काळात बँकेच्या संचालक मंडळाने सभासदांच्या हिताचे निर्णय घेतले. व्याजदरात कपात करुन नफा मिळवला. त्यामध्ये दिर्घ मुदत कर्ज, गृहकर्ज, शैक्षणिक कर्ज, वाहन तारण कर्जाचा व्याजदर कमी करण्यात आला. बँकेने या आर्थिक वर्षात चांगले काम केल्याने 2 कोटी लाभ झाला आहे. सभासदांच्या मुलांना परदेशात शिक्षण मिळावे यासाठी शैक्षणिक कर्जाचा व्याजदर कमी केला आहे. सभासदांच्या वारसांना 4 कोटी 31 लाख मदत केली आहे.

    कोरोना काळात अल्पदराने 53 कोटी कर्ज, 8 कोटी अल्पमुदत कर्ज वाटप करण्यात आले आहे. बँक टिकली पाहिजे. यासाठी संचालक मंडळ कटीबद्दल आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. येत्या काही दिवसात मोबाईल बँकींग, डिजीटल बँकीग करण्यासाठी संचालक मंडळ कटीबद्द आहे. बँकेला 2020-21 मध्ये 6 कोटी ढोबळ नफा झाला आहे, असे त्यांनी सांगितले.