डिस्कळ (ता. खटाव) डिस्कळ पंचक्रोशी कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना शशिकांत शिंदे प्रसंगी उपस्थित प्रदीप विधाते, तेजस शिंदे, महेश पवार, पांडूशेठ गोडसे व इतर
 डिस्कळ (ता. खटाव) डिस्कळ पंचक्रोशी कोरोना केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी मार्गदर्शन करताना शशिकांत शिंदे प्रसंगी उपस्थित प्रदीप विधाते, तेजस शिंदे, महेश पवार, पांडूशेठ गोडसे व इतर

कोरोनाच्या या संकटकाळात शासन व प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. प्रशासनाबरोबर शक्य असलेल्या सर्वानी या लढाईत आपलं योगदान देण्यास पुढाकार घ्यावा. शक्य असेल तेवढी मदत करून माझं योगदान देण्याचा मी प्रयत्न करत आहे. जो पर्यंत कोरोना संपत नाही तो पर्यंत 'खटाव, कोरेगाव' सह सातारा जिल्ह्यातील रुग्णांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवण्याचा माझा प्रयत्न राहील.

    वडूज  : उत्तर खटावमध्ये दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. येथील कोरोनाबाधित रुग्णांची गैरसोय होवु नये, त्यांना वेळेत उपचार घेण्यात कोणत्याही अडचणी येऊ नयेत. तसेच सौम्य व मध्यम स्वरूपाची लक्षणे असलेल्या कोरोनाबाधितांना आपल्या परिसरातच दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात. यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचे मत माजी पालकमंत्री आमदार शशिकांत शिंदे यांनी व्यक्त केले.

    डिस्कळ (ता. खटाव) येथील शिवाजी विद्यालयातील ५० बेडच्या सर्व सोयीयुक्त डिस्कळ पंचक्रोशी कोविड केअर सेंटरच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. या कोविड केअर सेंटरमुळे डिस्कळ विभागातील मोळ, मांजरवाडी, ललगुण, डिस्कळ, चिंचणी, अनपटवडी, पांढरवाडी, काळेवाडी, गारवडी यांसह चौदा गावातील कोरोना रुग्णांवर उपचाराची सोय उपलब्ध होणार आहे. याप्रसंगी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते, सातारा जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तेजस शिंदे, राजेंद्र कचरे, डिस्कळचे सरपंच महेश पवार, पांडूशेठ गोडसे, डॉ. अंबादास कदम, राजीव शिपटे तसेच परिसरातील सरपंच, उपसरपंच व डॉक्टर उपस्थित होते.

    यावेळी आ. शिंदे म्हणाले, कोरोनाच्या या संकटकाळात शासन व प्रशासन आपल्यापरीने प्रयत्न करत आहेत. प्रशासनाबरोबर शक्य असलेल्या सर्वानी या लढाईत आपलं योगदान देण्यास पुढाकार घ्यावा. शक्य असेल तेवढी मदत करून माझं योगदान देण्याचा मी प्रयत्न करत आहे. जो पर्यंत कोरोना संपत नाही तो पर्यंत ‘खटाव, कोरेगाव’ सह सातारा जिल्ह्यातील रुग्णांना योग्य त्या सोयी सुविधा पुरवण्याचा माझा प्रयत्न राहील.

    जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदीप विधाते म्हणाले, डिस्कळसह पंचक्रोशीतील कोणताही रुग्ण उपचारांपासून वंचित राहू नये म्हणून हे सेंटर होणे गरजेचे होते. या सेंटरमुळे ग्रामीण भागातील अनेक कोरोनाग्रस्तांची सोय झाली आहे. कोरोनाच्या संकट काळात संपूर्ण कोरेगाव मतदारसंघासह जिल्ह्यात आ. शशिकांत शिंदे हे कोरोनाग्रस्तांच्या मदतीला देवदूताप्रमाणे धावून जात आहेत. इच्छाशक्ती असेल तर माणूस काहीही करू शकतो हे आ. शशिकांत शिंदे यांनी कोरोना काळात वेळोवेळी दाखवून दिले आहे.

    दरम्यान, या सेंटरमधील रुग्णांसाठी जेवण, औषधे व इतर सर्व प्रकारची आवश्यक वैद्यकीय मदत आमदार शशिकांत शिंदे यांच्या वतीने पुरवण्यात येणार आहे. तसेच जे लोक सध्या कोविड सेंटरमध्ये आयसोलेशनमध्ये आहेत त्यांना ग्रामपंचायतीमार्फत एक महिन्याचे राशन देण्यात आले.