‘पुन्हा दिसू नको नाहीतर चारचौघात बडवून काढीन’; बांधकाम सभापतींची ठेकेदाराला जीवे मारण्याची धमकी

    सातारा : सातारा पालिकेच्या बांधकाम सभापती सिध्दी पवार यांनी कामात हलगर्जीपणा झाल्याचा आरोप करत भुयारी गटार योजनेच्या उपठेकेदाराला फोनवरून अर्वाच्च भाषेत शिवीगाळ केली. प्रचंड संतापलेल्या सभापतींनी रागाच्या भरात थेट जीवे मारण्याची धमकी दिलेला कॉल रेकॉर्ड व्हायरल झाल्याने साताऱ्यात एकच खळबळ उडाली आहे .

    सातारा शहराच्या पश्चिम भागात विशेषतः पालिकेच्या बांधकाम सभापती सिध्दी रविंद्र पवार यांच्या वॉर्ड क्र १७ मध्ये भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. या कामाच्या दरम्यान रामाचा गोट परिसरातील शिवशाही अपार्टमेंटची भिंत जेसीबीच्या धक्क्याने पडली. ठेकेदाराला सूचना देऊनही ते काम न झाल्याने सिध्दी पवार यांनी या कामाच्या उपठेकेदाराला फोनवरून थेट जीवे मारण्याची धमकी दिली. पवार यांचा संताप इतका अनावर झाला की ठेकेदारासह त्यांनी सातारा पालिका मुख्याधिकारी अभिजीत बापट यांनाही शिवीगाळ केली. ‘मॅडम, शांत व्हा या शब्दांत ठेकेदार विनवणी करत होता, तेव्हा सभापती आणखीनच आक्रमक होत म्हणाल्या, ए तू कोणाला शेंड्या लावतो आणि ठेकेदाराला सांग. पुन्हा दिसू नको नाही तर चारचौघात बडवून काढील. ठेकेदाराला थेट अशी धमकी मिळाल्याने त्याची बोलतीच बंद झाली. मात्र, पालिकेत जबाबदार म्हणून वावरणाऱ्या पदाधिकाऱ्यांनी अशी थेट सभ्यतेची पातळी सोडण्याचा प्रकार सोशल मिडियावर व्हायरल झाल्याने सातारकर ही अवाक झाले .

    काय आहे भुयारी गटार योजना ?

    सातारा शहराचे सांडपाणी भूमिगत मार्गाने शहराबाहेर नेण्याची ४२ कोटी रूपयांचा महत्वाकांक्षी प्रकल्प खासदार उदयनराजे भोसले यांच्या सत्ताधारी सातारा विकास आघाडीने राबविला आहे. या योजनेचा ठेकेदार विशेष राजकीय मर्जीतला असून, त्याने पावसाळ्यात कामाची मुदत संपलेली असताना शहराच्या पश्चिम भागातील रस्ते पाईप टाकण्यासाठी खणून ठेवले आहेत. या कामावरून ठेकेदार व नगरसेवक यांच्यात सातत्याने वादाच्या फैरी झडत आहेत. मात्र, या प्रकरणात सभापतींनी थेट जीवे मारण्याची धमकी दिल्याने साताऱ्यात या प्रकरणाची उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे .