वहागांव येथे सर्व्हिस रोडवर कंटेनर पलटी; रेल्वे साहित्य सर्व्हिस रोडवर विखुरले; लाखो रूपयांचे नुकसान

    उंब्रज : पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर वहागांव (ता.कराड) गावच्या हद्दीत भरधाव वेगात जाणाऱ्या कंटेनर चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून अपघात झाला. यामध्ये रेल्वेचे साहित्य सर्व्हिस रोडवर विखरून सर्व्हिस रोड काही वेळ बंद झाला होता. हा अपघात रविवारी (दि.१३) दुपारी झाला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहानी झाली नाही.

    याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, राष्ट्रीय महामार्गावरून मुंबई ते धारवाड (कर्नाटक) असा रेल्वेच्या साहित्याची वाहतूक करणारा मालट्रक कंटेनर (क्रमांक के.ए.०१.एजे. ४१८०) हा वहागांव गावच्या हद्दीत आल्यानंतर चालक मुलराज राजबो कश्मिर (वय ४५) यांचा कंटेनरवरील ताबा सुटल्याने कंटनेर महामार्गाच्या कडेला असणाऱ्या नाल्यात पलटी झाला. यावेळी कंटेनरमधील साहित्य सर्व्हिस रोडवर विखुरले. या घटनेची माहिती स्थानिक नागरिक, तसेच हेल्पलाईन विभागाचे दस्तगीर आगा, जितेंद्र भोसले, सदाशिव सकट, तानाजी नामदास यांनी मदत करून सर्व्हिस रोड वाहतूकीसाठी खुला केला.