इंद्रजीत मोहितेंसारख्या कर्तृत्वशून्य नेतृत्वामुळेच सहकार अडचणीत; जगताप यांचा पलटवार

  कराड : कृष्णा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत ज्या पॅनेलच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले आणि ज्यांना सभासदांनी पूर्णपणे नाकारले, त्या रयत पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजीत मोहिते यांची स्वत:च्या अस्तित्वासाठी केविलवाणी धडपड सुरू आहे. निव्वळ स्व:अस्तित्व सिद्ध करण्याच्या केविलवाण्या धडपडीतून त्यांनी शनिवारी कराडमध्ये पत्रकार परिषद घेतली. पण त्यावेळी त्यांनी सहकाराबद्दल मांडलेली भूमिका नेहमीप्रमाणेच केवळ शब्दांचे निरर्थक बुडबुडे निर्माण करणारी आहे.

  स्वत:ला विचारवंत सिद्ध करण्यासाठी ते सातत्याने जड भाषेचा वापर करतात. पण त्यातून नेमका कोणताच अर्थबोध ना सभासदांना होतोय, ना सरकारला! अशा असंबंध आणि अर्थशून्य मांडणीमुळेच सभासदांनी याहीवेळी त्यांना नाकारले आहे. पण हे उमजून काम करण्यापेक्षा, कर्तृत्वशून्य राहून केवळ सहकारावर भाषणं झोडणाऱ्या त्यांच्यासारख्या नेतृत्वामुळेच सहकार अडचणीत आला आहे, अशा शब्दांत य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांनी डॉ. इंद्रजित मोहिते यांच्यावर पलटवार केला आहे.

  कृष्णा कारखान्याच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सभासदांनी विरोधी संस्थापक आणि रयत पॅनेलच्या सर्व उमेदवारांना धूळ चारत, सुमारे 11 हजारांच्या मताधिक्याने जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला सत्तेवर पुन्हा आणले आहे. रयत पॅनेलच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिटदेखील जप्त झाले असून, त्या पॅनेलचे नेते डॉ. इंद्रजीत मोहिते यांना मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले आहे. या पार्श्वभूमीवर निवडणुकीनंतर प्रथमच डॉ. मोहिते यांनी कराड येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

  ‘बघ्याच्या भूमिकेमुळे सहकार अडचणीत’ अशा आशयाचे विधान करून त्यांनी सहकार क्षेत्राबद्दलची आपली मते मांडली. मात्र या पत्रकार परिषदेत त्यांनी मांडलेल्या मुद्द्यांबाबत कृष्णा कारखान्याचे व्हा. चेअरमन जगदीश जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे पलटवार केला आहे.

  त्यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे, की ज्यांना या निवडणुकीत सभासदांनी सपशेल नाकारले ते डॉ. इंद्रजीत मोहिते अजूनही विचारवंताच्या भूमिकेतच वागत आहेत. त्यांच्या या सततच्या ‘अ’विचारी मांडणीचा उबग सभासदांना गेली अनेक वर्षे आलेला आहे. जड आणि सर्वसामान्य लोकांना न कळणाऱ्या भाषेत बोललो की आपण काहीतरी महत्वाचे आणि ‘भारी’ बोलतोय, असा त्यांचा गोड गैरसमज आहे. यातूनच दिवसेंदिवस त्यांची जनतेशी नाळ तुटत चालली आहे. पण त्याचे कुठलेही सोयरसुतक त्यांना नाही. शनिवारी त्यांनी पत्रकार परिषदेत मांडलेले अनेक मुद्देही असेच असंबंध आणि गैरलागू आहेत.

  खरंतर यातील काही मुद्दे ते निवडणुकीच्या वेळीदेखील सभासदांसमोर मांडत होते. पण सभासदांनी ते मुद्दे स्पष्टपणे धुडकावून लावत, त्यांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. पण तरीही आपले मुद्दे पुढे रेटण्याची भूमिका पाहता, ते सभासदांनी दिलेल्या जनमताचा स्पष्ट आदर करताना दिसून येत आहेत.

  फुकटची शाब्दिक बडबड

  सर्वसामान्य शेतकऱ्यांची समृद्धी हे सहकाराचे ब्रीद राहिले आहे. ते जपण्याचा प्रयत्न आम्ही निश्चितच करत आहोत. किंबहुना सहकारामध्ये काम करणारे अनेकजण आपापल्या परीने सहकाराच्या वृद्धीसाठी झटत आहेत. पण निव्वळ फुकाची शाब्दिक बडबड करणाऱ्या डॉ. इंद्रजीत मोहितेंनी मात्र सहकाराला रसातळाला नेण्याचे काम केले आहे. अन्य सहकारी संस्थांच्या कारभारावर टिका करणारे डॉ. मोहिते ते ज्या सहकारी सस्थांचे संस्थापक – मार्गदर्शक आहेत, त्या सहकारी संस्था आज डबघाईला आल्या आहेत. पण त्याबद्दल मात्र साळसूद मौन बाळगून, केवळ चांगल्या चाललेल्या सहकारी संस्थांवर टीका करण्याशिवाय दुसरा उद्योग त्यांच्याकडे उरलेला नाही.

  बघ्याच्या भूमिकेमुळे नाही, तर डॉ. इंद्रजीत मोहिते यांच्यासारख्या कर्तृत्वशून्य नेतृत्वामुळेच सहकार अडचणीत आला आहे. आणि हे सत्य सभासदांना उमगल्यामुळेच त्यांना कृष्णा कारखान्याच्या सभासदांनी सपशेल नाकारले आहे. सहकाराची काळजी करण्यापेक्षा त्यांनी स्वत: नेतृत्व करत असलेल्या सहकारी संस्था कशा उभारी घेतील, तेथील सभासदांना त्यांचे पैसे, ठेवी परत कशा मिळतील याची काळजी करावी, असे प्रतिपादन जगताप यांनी प्रसिद्धीपत्रकात केले आहे.